लोकसंस्कृतीचे परस्पर प्रेम - यात्रा आणि तमाशा
By SameerBapu on मन मोकळे from https://sameerbapu.blogspot.com
मराठी माणसाला मुळातच उत्सव आणि सणवारांचे अतिशय अप्रूप आहे. त्याच्या जोडीने हरेकाची कुलदैवते, ग्रामदैवते आणि कुळपुरूषांचे देवदेव इत्यादींचे सोहळे असतातच. याखेरीज विविध बुवा, महाराज, साधू बैरागी यांचेही उत्सव असतात, हे सर्व एकीकडे आणि गावोगावच्या यात्रा एकीकडे! यात्रा म्हटलं की गावाला नवं उधाण येतं, माणसं खडबडून कामाला लागतात आणि त्यांच्या जोडीला पंचक्रोशीतलं चराचर देखील कामाला लागतं. घरोघरी यात्रेचा खुमार वाढू लागतो. साधारणतः यात्रांचेदेखील ठराविक मौसम असतात. मार्गशीर्ष संपून पौषाची चाहूल लागताच पाऊस आणि थंडी जोडीने येतात, हळूहळू पाऊस ओसरतो आणि थंडीचे साम्राज्य सुरू होते. याच हंगामात खेडोपाड्यांत जत्रा यात्रांचा मौसम सुरु होतो. कुठे ग्रामदैवताची जत्रा भरते तर कुठे पीरबाबाचा उरूस भरतो. अद्यापही हे दोन्ही यात्रा उत्सव हिंदू मुस्लीम एकत्रितपणे साजरा करतात. कैक वर्षांपासून राज्यभरातील अनेक गावांत तशी परंपराच आता रूढ झाली आहे. आजकाल ज्या यात्रा साजऱ्या होतात त्यांचे स्वरूप आणि गतकाळातील स्वरूप यात प्रचंड फरक होता. गावकरी मंडळी आपआपल्या नातलगांना, पैपाहुण्यांना आवतण धाडतात. घरोघरी माणसांची लगबग वाढू लागते. गल्ल्या माणसांनी फुलून जातात. फर्मास जेवणाचे बेत होतात, जेवणावळी होतात, पंगतीच्या पंगती उठतात. जिकडं तिकडं घमघमाट होतो. प्रत्यक्ष यात्रेच्या दिवसापर्यंत हा माहौल टिकून असतो. हे सर्व करण्यामागे भिन्न प्रकारच्या श्रद्धा असल्या तरी आजकाल आणखी एक कारण असते आणि ते म्हणजे यात्रांच्या निमित्ताने भेटी गाठी होतात सबब यात्रा जोरातच झाल्या पाहिजेत असा सूर सगळीकडे दिसतो. याची सुरुवात यात्रेची तारीख नक्की होण्यापासून असते. तारीख तिथी नक्की होताच गावाला जणू उधाण येते. सर्वांच्या चेहऱ्यावर एक अनामिक तेज झळकते. सासुरवाशिणींना सांगावे धाडले जातात, त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच असते. गावातील घरा घरांत सजावट केली जाते. मांडव उभे केले जातात आरास मांडली जाते. गल्ली बोळात विद्युत रोषणाई केली जाते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी गावाच्या कमानीपासून ते वेशीच्या चारी दिशांना भलेथोरले फ्लेक्स आजकाल उभे केले जातात. स्पर्धा साजऱ्या होतात. मुख्य धार्मिक उत्सव वगळता अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचे नियोजन असते, त्यासाठी गावातल्या तरुण मंडळीत जणू चुरस निर्माण होते. खरे पाहू जाता यात्रेचा कालावधी म्हणजे विविध जाती धर्मियांच्या देव -देवतांचा नैमित्तीक उत्सव होय. परस्पराविषयीच्या प्रेमापोटी आणि शेती माती गावकीच्या ऋणापायी गावोगावची माणसं गोळा होतात. उत्सवस्थळापाशी वा मंदिर दर्ग्यापाशी रेंगाळतात, एखादं वडपिंपळाचं नाहीतर आंबा चिंच निंबाचं डेरेदार सावलीचं झाड शोधून तिथे विसावतात, गप्पा होतात, ख्यालीखुशाली विचारून होते. संध्याकाळ होताच माणसं पांगू लागतात आणि दोनेक दिवसात गावातली लगबग कमी होते. विविध ठिकाणी पडलेली पालं उठतात, तंबू काढले जातात, मोठाल्या यांत्रिक खेळण्यांचे जोड ढिले करून त्यांना अवजड मालट्रकमध्ये भरले जाते. मंदिरासमोरचा मांडव सर्वात शेवटी हलवला जातो, निरोपाचे विधी होतात आणि खऱ्या अर्थाने यात्रा संपते. यात्रा काळात हे विधी कुणी करायचे याचेदेखील एक गणित असते, यात्रेतील हरेक धार्मिक गोष्टींचे स्वरूप निश्चित असते. त्याचे मानकरी ठरलेले असतात. जे ते काम ज्याने त्यानेच करावे लागते, त्यात दुसऱ्याची ढवळाढवळ चालत नाही. यात गावातील विविध जातींची माणसं असतात. पूजेचा मान, अभिषेक विधी, धुपारती, नैवेद्य अर्पण, दिवाबत्ती, नारळ वाहणे, पालखीला खांदा देणे इत्यादी गोष्टींचे मानकरी असतात. खरेतर ही गावाची सामाजिक वीण असते! यातूनच एकसंध गावकी आकारास येते जी संकटकाळी एकमेकांसाठी धावून जाते. यात्रा काळ हा जसा हरेक घरातल्या बायकापोरांसाठी कल्ला करणारा काळ असतो तसाच गावातल्या म्होरक्यांना आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्याचा कसोटीचा काळ असतो. तरुणांसाठी विविध स्पर्धांमधून स्वतःला चमकवण्याची इरस जागते. यात्रेत हौसे गवसे नवसे असे सगळेच आलेले असतात. त्यांच्या दिमतीसाठी आणि गोळा झालेल्या तमाम अठरापगड लोकांसाठी मनोरंजनाच्या खंडीभर गोष्टी उपलब्ध केल्या जातात. खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हॉटेलं, नटण्या मुरडण्याच्या सामग्रीने सज्ज असलेली दुकानं, कापड चोपड विकणारी दुकानं, सांसारिक वस्तूंची दालनं, पोरासोरांसाठी खेळण्या, आकाशपाळणे, मौत का कुंआ आणि शेकडो जिनसा तिथे मौजूद असतात. या सर्वांच्या जोडीने आणखी एका महत्वाच्या गोष्टीची ओढ यात्रा जाहीर झाल्यापासूनच असते ती म्हणजे तमाशाचा फड! यात्रेची घोषणा होताच सगळ्यांचे कान टवकारले जातात आणि जिकडे तिकडे चावडीपासून वेशीपर्यंत आणि गावाच्या शीवेपासून ते गच्च भरलेल्या पारापर्यंत यंदा तमाशाचा फड कोणता आणला जाईल याची रंगेल चर्चा झडू लागते. पानाचा विडा रंगू लागतो, तंबाखूचे बार भरले जातात, दुपारच्या शिळोप्याच्या गप्पांत पत्त्यांचे डाव पिसताना देखील विषय एकच असतो, यंदा कोण? पारुबाई, मंजुळाबाई, हौसाबाई, रखमाबाई, सुनंदा तारा की जया छाया? जो तो आपआपल्या वकुबाप्रमाणे अंदाज वर्तवू लागतो. खरे तर हे अंदाज म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या इच्छा असत. ज्याला जिची तमाशाची बारी आवडलेली असे तो तिचे नाव घेई आणि म्हणे, "मी तर हिच्याच नावाची चर्चा समदीकडं ऎकलीय बाबांनो!"शेतात खुरपणाऱ्या बायकांपासून ते औत धरणाऱ्या सालगड्यापर्यंत सगळ्यांना यात रस असतो. दुपारच्या वक्ताला बांधावर फडक्यातली भाकरी सोडताना शेतातल्या गप्पा याच वळणावर येऊन थांबत. मग कुणी एक बाई सांगे की, "मागल्या साली आल्ती ती लै गंड्याची होती, सदू पाटलाची पार कळा खाल्ली बाई तिनं!" एकीने इतका बोलायचा अवकाश की मग गप्पांना विषयच मिळे. कोणत्या गड्याला तमाशातल्या बाईचा किती नाद याची उजळणीच तिथं सादर होते. मग एखादा म्हाताराच त्यांना वेसण घाले आणि पुन्हा कामाला जुंपे. लिगोरी खेळणाऱ्या शेंबड्या पोरांनादेखील यातलं थोडंफार कळतं, ओठावर मिसरूड फुटलेली पोरं तर अगदी कान देऊन या गप्पा ऐकत असतात. मग अशी पोरं आजूबाजूला असली की बायका सावध होतात आणि ओठाला पदर लावून बारीक आवाजात तमाशाचं दळण दळत राहतात. रात्री देवळांतलं कीर्तन आटोपून घराकडं जाणारी पिकली पानं देखील दबक्या आवाजात याची चर्चा करतात, मात्र त्यांचा अंदाज वेगळाच असतो. त्यातला एखादा रंगेल म्हातारा मिशीला पीळ भरत अगदी बेरक्या तऱ्हेने सांगतो, "मंग क्काय? औंदा फेटा हवंत उडिवणार न्हाय का? की उगीच आपलं घरी जाऊनशान घोंगडी ओढून तोंड लपिवणार? नारबाचं गोतार काय ठ्ठीक दिसत न्हाय गड्या, गुडघं आरलं तोंडाचं बोळकं झालं तरी अजुनबी रंगू तेल्याच्या कट्ट्यावर बसूनशान कोंचा फड आणायचा याची गंतं समजिवतो! छ्या गड्या!" वास्तवात हा नारबा यातल्या बहुतांशांच्या मनात दडलेला असे. आयुष्यभर खस्ता खाऊन काबाडकष्ट थकलेली ही ज्येष्ठ मंडळी आपल्या परीने यात्रेतील तमाशाचा वेगळ्या पद्धतीने आनंद घेतात. गावातील तरण्या कर्त्यासवरत्या मंडळींसाठी याचे अनेक पैलू असतात. हे सगळे नादिष्ट असतात अशातली गोष्ट नसते. किंवा यांना बाईबाटलीचा नाद असतो असेही नसते, याहीपलीकडे जाऊन गावातल्या जत्रा म्हणजे तमाशातल्या स्त्रियांसाठी हपापलेल्या आंबटशौकिनांचे एकत्र येणे असेही काही नसते. वा निव्वळ वासनांचे डोह ही इथे नसतात. दोन घडीच्या निखळ करमणूकीशिवाय वर्षभर न दिसणारा शृंगाराचा हा एक रांगडा अविष्कार असतो ज्याची गावातल्या तमाम मंडळींना ओढ असते. तमाशाचा फड आला नाही तर यात्रेला अर्थ नसतो असंही काही ठाशीव सूत्र नसतंच, मात्र तमाशाचा फड कुठला आला यावरून गावात कुणाचा किती वट्ट आहे आणि पंचक्रोशीत कोणतं गाव कोणत्या गावाच्या मागेपुढे आहे याचे आडाखे बांधले जातात. याही गोष्टीमुळे गावातल्या यात्रेत कोणता फड येणार याला बऱ्यापैकी महत्व येते. मुळात आताच्या धकाधकीच्या जीवनात आणि डिजिटल काळात खेडी देखील वेगाने बदलू लागलीत, गावकीच्या जुन्या खुणा प्रचंड वेगाने पुसल्या जाताहेत, जुनी प्रतिके मोडून निघताहेत, निव्वळ घरंदारं बदलताहेत असंही नाहीये तर माणसं देखील नव्या युगाच्या कृत्रिम जगण्याच्या दिशेने खेचली जाताहेत. मग आपल्या गावाची ओळख म्हणून निदान यात्रा तरी जपली पाहिजे हा अट्टाहास जपला जातोय आणि त्याला आताच्या दशकात काहीसे अस्मितेचे स्वरूप येऊ लागलेय. याकरिता पुष्कळ माणसं राबतात, एक यंत्रणा उभी केली जाते, मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला जातॊ. वास्तवात गावातल्या गावदेवाचा गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून केलेला उत्सव म्हणजे यात्रा असं साधंसरळ स्वरूप पूर्वी होतं, ते आता मागे पडून आपल्या गावाची गावदेवाची खूण सांगणारा, अस्मितेचं दर्शन घडवणारा माणसांच्या उत्साहाचा धार्मिक सोहळा म्हणजे यात्रा झालाय. यात्रेत आणला जाणारा तमाशाचा फड हा या सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. यात्रा कितीही दिवसांची असली तरी फड आणला जातोच! त्याशिवाय रंगत चढत नाही. राज्यभरात लोककलेचे प्रतिक म्हणून तमाशाकडे पहिले जायचे, मात्र बदलत्या काळानुसार मनोरंजनाची साधने बदलली, लोकांच्या आवडी निवडी बदलल्या, नवनवी साधनं आली, घरबसल्या अफाट मनोरंजन सामग्री उपलब्ध झाली नि जुन्या ढंगाची ठेवणं असणारा तमाशा मागे पडत गेला. लावणी केवळ इव्हेंटपुरती उरली. तमाशा कलावंतांची उपासमार सुरु झाली. मोठाल्या गावांच्याबाहेर असणारी कलाकेंद्रे चालवणं जिकिरीचं काम झालं. त्यात आधुनिक संगीताचा बाज आणि नव्याची नवथर ओढ यात लावणीला देखील उतरतीची कळा लागली. काही वर्षांपूर्वी उत्तरेकडील राज्यांत ज्या वेगाने मुजरा नर्तिका देशोधडीला लागल्या आणि त्यांचे कोठे उध्वस्त झाले त्याच पद्धतीने तमाशा लयास जातो की काय असे वाटत होते. मात्र गावोगावच्या यात्रांनी तमाशाला मोठा आधार दिला आहे हे कुणी नाकारणार नाही. यात्रा काळात साजऱ्या होणाऱ्या तमाशाच्या फडासोबतच जंगी कुस्तीचा फड देखील यात्रेत असतो मात्र कुस्तीचे मैदान कोण मारणार, लाल माती नि मानाची गदा कोणाच्या हाती चमकणार याची सर्वांनाच उत्सुकता असते असे नाही. शिवाय कुस्त्यांना निदान लोकाश्रय,राजाश्रय आहे परंतु तमाशा फडाच्या बाबतीतले चित्र वेगळे आहे. त्यामुळे यात्रा काळात गावोगावी उभारले जाणारे तमाशाचे फड ही लोककलेची अभूतपूर्व जपणूक आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे यात्रेसाठी गाव जसे उत्सुक असते तद्वतच तमाशाचे विश्व् देखील उत्सुक असते. कोणत्या गावात कोणता म्होरक्या महत्वाचा आहे आणि कुठं आपली डाळ शिजणार याची गणितं घालून फडमालकांचे वस्ताद गावोगावी आपल्या बारीची रुजवात करून देत फिरतात, गावात याची चर्चा होते. यात्रा कमिटीत यावर ठराव घेताना गावातले दोन तीन दिग्गज गट आपल्या पसंतीची नावं पुढं करतात. ज्याच्या मर्जीतला फड यात्रेत येतो त्याचं गावात वजन असतं असा संदेश यातून जात असल्याने जो तो आपल्या नावासाठी आग्रही असतो. अखेर बऱ्याच मोठ्या गुऱ्हाळानंतर एकदाचा पिट्टा पडतो, बारी पक्की केली जाते. मग सुपारी द्यायची गोष्ट निघते. मोजकी मुरलेली मंडळी एका तर्राट सकाळी जिपडं घेऊन गावातनं सुसाट निघतात ते थेट नारायणगावच्या वाटेला लागतात! पुणे नाशिक महामार्गावरच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावचा तमाशा पंढरी म्हणून राज्यात नावलौकिक आहे. नारायणगावात राज्यातील सगळे नावाजलेल्या तमाशाच्या राहुट्या असतात. इथेच येऊन गावोगावचे कारभारी तमाशा मालकांना सुपाऱ्या देतात. यंदाही नारायणगावात आतापर्यंत जवळपास ३२ राहुट्या आल्या आहेत. सुरेखा पुणेकर, मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, दत्ता तांबे, मालती इनामदार अशा एकाहून एक सरस तमाशाच्या राहुट्या सध्या नारायणगावात आहेत.मधल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे सगळीकडेच यात्रा जत्रा झाल्या नाहीत, सिनेमे नाटके तमाशा सगळंच बंद पडलं होतं. यंदा मात्र ही रौनक परतली आहे. दोन अडीच वर्षानंतर ढोलकीवर पुन्हा थाप पडलीय. घुंगरांचा नाद ऐकायला मिळतोय. आपापले फड गाजविण्यासाठी तमाशा कलावंतांच्या रिहर्सल (सराव) सुरु झाल्यात. निर्बंध हटविल्यानंतर दोन वर्षांच्या खंडानंतर यात्रा-जत्रांचं जंगी आयोजन केलं जातंय. तमाशा पंढरी असलेल्या नारायणगावात गावोगावचे कारभारी आणि गावपुढारी राहुट्यांवर येऊन कलावंतांना सुपाऱ्या देऊन तारीख ठरवतात. मोठ्या अंतरानंतर आपली कला सादर करायची असल्याने यंदा कलावंतांनी लवकरच सराव सुरु केलाय. आपला फड चांगला रंगावा, कार्यक्रम उत्तम व्हावा, यासाठी सगळे कलाकार जोमाने तालमी करतायत. यापुढचे सगळे हंगाम निर्विघपणे पार पडो, अशी प्रार्थनाच कलाकार गणरायाचरणी करतायत. तशी तर महागाई दर साली वाढतच असते. मात्र यंदा तिचे स्वरूप अक्राळविक्राळ असेच आहे. शिवाय यंदा उत्पन्नही कमी आहे तरीही यात्रेस पैसे देताना कुणी फारसं खळखळ करताना दिसत नाही. मात्र दोनतीन साल आधीच्या भावात आता तमाशा फड येऊ शकत नाही. गॅस जवळपास हजार रुपयांना झालाय तर पेट्रोल डिझेलच्या दरांनीही शंभरी पार केली आहे. तमाशाच्या फडात ५० हून अधिक माणसं असतात. यांचा पगार, मानधन आणि तमाश्याच्या साहित्याचा खर्च हा पेलवण कठीण होत चाललं आहे. त्यांच्या खाण्यापिण्याचा-येण्याजाण्याचा खर्च देखील कित्येक हजारांत आहेत. चांगली सुपारी मिळावी असं हरेक बारीच्या मालकाला वाटतं. हरेक गावच्या यात्रेची गोष्ट न्यारीच असते, मात्र दस्तुरखुद्द नारायणगावमध्ये देखील यात्रा भरते आणि तिथेही तमाशाचा फड रंगतो. इथल्या तमाशाचे वैशिष्ट्य असे की विविध कलावंत विना मोबदला आपली कला सादर करतात. एका अर्थाने हा बिन पैशाचा तमाशा होय! नारायणगावात मुक्ताईदेवीची यात्रा भरते तिथे विविध तमाशा बारीवाले आपली कला सादर करतात. आजमितीस पन्नासहून अधिक तमाशे आधुनिक काळातील मनोरंजनाच्या सोयीसुविधांसमोर या नारायणगाव मध्ये तग धरून आहेत. हल्ली ही जिवंत कला टिकवून ठेवण कठीण होऊन बसलं आहे.कमीत कमी ४० ते ५० कलावंत एका तमाशाच्या फडात असतात.यांच मानधन आणि तमाश्याच्या साहित्याचा खर्च हा पेलवण कठीण होत चाललं आहे.तरीही या नारायणगावच्या मुक्ताई देवीच्या यात्रेच्या निमित्तान मात्र आपला तमाशा हे तमाशा फड मालक विना मोबदला दाखवितात.एवढंच नाही तर आपलाच तमाशा व्हायला हवा याकरिता आग्रही असतात. एकीकडे तमाशाचा फड रंगत असताना दुसरीकडे फटाक्यांची आतषबाजी सुरु असते. नारायणगावात याचा मान मुस्लिम समाजाच्या अत्तार कुटुंबास आहे! हे शोभेचे दारूकाम लक्षवेधी असते, लोकांच्या मनात याची वेगळीच उत्सुकता असते. यात्रेतले धार्मिक विधी टिपेस पोहोचतात तो दिवस अपार गर्दीचा असतो. एकीकडे देवाला साडी चोळीकापड दिले जाते, कुठे तिखटाचा तर कुठे गोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो. पूजा आरती संपन्न होते, पालखीत मिरवणूक निघते, रात्री छबिना निघतो गर्दीला लक्ष पाय फुटलेले असतात आणि आकाशातले सहस्रावधी तारे तारका गावातल्या आस्मंतात लकाकत असतात. धार्मिक विधी उरकत येऊ लागले की म्हामूर गर्दी तमाशाच्या तंबूसमोर रेंगाळू लागते. तिकिटं संपतात, गणगौळण सादर होऊ लागल्याचं स्पिकरच्या कर्ण्यातून उमगू लागतं. नमन होते नि मग बतावणी होते. पाहता पाहता वग रंगू लागतो. तंबूत शिट्ट्यांचा पाऊस पडू लागतो. नर्तिकांचे घुंगरू छनछन्नन वाजू लागतात, ढोलकी गर्जू लागते. नुसती राळ उडते. फक्कड लावण्या सादर होत राहतात, प्रेक्षकांच्या डोईवरचे फेटे हवेत उडू लागतात. तमाशा रंगात येतो आणि ज्यांनी बारीची निवड केलेली असते ते समाधानाने भरून पावतात. तीनचार दिसात नाहीतर हप्त्याभरात तमाशाचा तंबू आपलं बस्तान हलवतो, यात्रेचं नवं गाव शोधलं जातं. नवी माणसं नवं गाव समोर येतं मात्र उत्साह तोच असतो. सादरीकरणातला बहारदार आनंदही तोच असतो. गावोगावच्या यात्रा म्हणजे तमाशाच्या देहातल्या आत्म्याची धुगधुगी जित्ती ठेवणाऱ्या धमन्या आहेत, जोवर या धमन्यात ताकद आहे तोवर तरी तमाशा जिवंत राहील याबाबतीत शंका नाही. गावजत्रेचं एक विशिष्ठ धार्मिक अधिष्ठान असूनही लोककलेला आश्रय देणारं हे बलस्थान अत्यंत अभूतपूर्व असं आहे. कारण तमाशा फडांना आता यात्रा जत्रांचाच आधार उरलाय, जोवर यात्रा आहेत तोवर घुंगरू खणकत राहणार हे निश्चित! राज्यभरातील अनेक लावणीसाम्राज्ञीनि विविध यात्रेत मिळवलेले अनुभव हा लोककलेचा जिताजागता इतिहास आणि वर्तमान आहे. त्यांचे येणारे भविष्य देखील याच्याशीच निगडित आहे, निदान त्यांच्या जगण्यासाठी आणि कलावंतांच्या कलेची कदर राखण्यासाठी यात्रेतला हा घटक तगला पाहिजे. यात्रा संपताच घरे उदास होतात, शेत शिवारे सुन्न होतात आणि परिसर काहीसा उजाड वाटू लागतो, माणसं तोंड बारीक करून कामाला लागतात मग गावातली जाणती माणसं यंदाच्या वर्षी रंगलेल्या तमाशाच्या आठवणी नव्याने सांगू लागतात. गावजीवनातील करमणुकीचा हा परमोच्च दिवस गावकरी आपल्या मनात वर्षभर जतन करून ठेवतात आणि आगामी वर्षासाठी नवी स्वप्ने पाहू लागतात. रोजच्या कष्टातून या आठवणींनी प्रसन्न झुळूक मिळते, उसंत मिळाल्याचा अनुभव येतो आणि मग कष्टकरी बळीराजाचे हात नव्या जोमाने कामाला लागतात! यात्रेतील तमाशाचं अस्तित्व गावजीवनाच्या आत्म्याशी पुरते तादात्म्य पावलेलं आहे याला कुणी विभक्त करू शकत नाही! यात्रा आणि तमाशा हे परस्परांवर प्रेम असणारे असे एकजिनसी अधिभौतिक घटक आहेत की ज्यांची नाळ गावजीवनाशी इतकी घट्ट जुळलीय की गावाच्या डीएनएमध्ये देखील ती आढळावी! - समीर गायकवाड