बळी (कादंबरी) - पुस्तक परीक्षण

By jyubedatamboli on from https://jyubedatamboli.blogspot.com

बळी (कादंबरी) -   पुस्तक परीक्षण✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी लेखक- श्री. सुनिल इनामदारप्रकाशक- पद्मरत्न प्रकाशन, इचलकरंजी ISBN: 978-81-951642-0-2       लेखक सुनिल इनामदार यांच्या धारदार लेखणीतून साकारलेली 'बळी' ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती लगेच वाचनात आली हे माझे परमभाग्य समजते.       'बळी' हे कादंबरीचे शीर्षक वाचल्यानंतर 'बळी तो कान पिळी' या म्हणीची आठवण झाली. बळी कुणाचा गेला, कान कुणी पिळला हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. आजकाल सतत कानावर पडणाऱ्या हुंडाबळी, नरबळी, भूकबळी या शब्दांचीही आठवण झाली. बळी कोण पडला, कुणाकडून पडला हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने कादंबरी वाचण्यास सुरूवात केली. वाचल्यानंतर लक्षात आले की बळी या शब्दाचा वेगळा अर्थ आहे. एखाद्याचे मानसिक खच्चीकरण करणे, त्याच्या प्रगतीला मागे खेचणे हासुद्धा बळी घेण्याचाच एक प्रकार आहे.       या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे कादंबरी, लिहून झाल्यानंतर ३५ वर्षानंतर प्रकाशित होणे. लेखक सुनिल इनामदार यांनी डाव्या कामगार काम करताना आलेले अनुभव प्रभावीपणे शब्दबद्ध केले आहेत. कार्यकर्त्यानी भोगलेल्या यातना ठळकपणे, खूबीने वाचकांच्या समोर उभ्या केलेल्या आहेत. थोडक्यात ३५ वर्षे जपून ठेवलेली ही मर्मबंधातली ठेव, एक ऐतिहासिक ठेवा मुक्तपणे, सहजसुंदर शैलीत वाचकांच्या हाती दिला आहे.       चंद्रशेखर कळंबीकर हा एक साधाभोळा, अतिशय प्रामाणिक, राजकीय डावपेच माहित नसलेला, पक्षासाठी रात्रंदिवस काम करणारा सच्चा कार्यकर्ता आहे. त्याच्या जीवन संघर्षाची ही कहाणी आहे. चंद्रशेखरकडे संघटन कौशल्य आहे. हजारो श्रोत्यांवर प्रभाव टाकणारी वक्तृत्वशैली त्याच्याकडे आहे, हे सांगताना लेखक म्हणतात "चंद्रशेखरचं तंत्रच वेगळं. सरळ चौकात जाऊन स्टेजवर, पारावर उभं रहायचं आणि मेगँमाईकवर क्रांतिगीते म्हणायला सुरुवात करायची, तसा त्याचा आवाजही खणखणीत, त्याची भाषणाची शैलीही ढंगदार होती. हावभाव, आवाजातील चढ उतार, पटवून द्यायची पद्धत उत्तम होती.''       चंद्रशेखरला अनेक लोक भेटले. बरे वाईट अनुभव आले. त्याच्या सानिध्यात मुंबईत राहणारे कार्यकर्ते ही आले, की ज्यांना बड्या पुढाऱ्यांचे डावपेच, प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलून स्वतःचे चमचे पुढं घुसविण्याची वृत्ती माहित होती त्यांनी चंद्रशेखरला ते सांगण्याचा प्रयत्नही केला पण त्याची पक्षनिष्ठा ते ऐकायला तयार नव्हती.       मोठ्या पुढाऱ्यांची वृत्ती स्पष्ट करताना लेखक म्हणतात       "मोठ्या पुढाऱ्यांना अडचणीत आणणारा कार्यकर्ता नकोसा वाटायचा. मग अशा कार्यकर्त्यांला वेगवेगळ्या मार्गाने आवरण्याचा प्रयत्न व्हायचा. कधी वरिष्ठ पदावर घेण्याचं तर कधी आर्थिक लाभाचं अमीष दाखवलं जायचं त्यातून तो बदलला नाही तर त्याची बदनामी करायचा हुकमी डाव नेतेमंडळी खेळायची".या उताऱ्यावरून लेखकाची उत्कट व निर्भिड लेखनशैली वाचकांना दिसून येते.       चंद्रशेखरच्या बाबतीत त्याचा मित्र विकास त्याला एकदा म्हणतो, "शत्रूच्या गराड्यात देखील मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून आराम झोपू शकेन" अशा मित्रप्रेमाचे, चंद्रशेखरच्या उतुंग व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू वाचकांसमोर मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.ही कादंबरी फारच सुंदर सामाजिक, तात्विक  विचार देते. वाचकांना चिंतन करायला लावते. उदाहरणार्थ..."तुम्ही बंदूक कुणाकडून घेता यापेक्षा ती कुणाविरूद्ध चालवता हे महत्त्वाचं आहे." "तोंडानं म्हणायचं भवानी भवानी आणि मनात मात्र अल्ला को प्यारी है कुर्बानी" हे अहिल्या रांगणेकर यांचं वाक्यही चपखलपणे बसले आहे." "एखाद्या युनिटमध्ये वाद निर्माण होणं ही नेत्यांच्या दृष्टीने सुखद घटना असते."जातीव्यवस्थेवर आसूड ओढणारं एक वाक्य वाचकांच्या काळजाला जाऊन भिडते. ते वाक्य असे..."चळवळीतल्या ब्राम्हणी पुढाऱ्यांना कार्यकर्ता कामासाठी पाहिजे होता पण दलित कार्यकर्ता नको होता."        ही कादंबरी एका प्रामाणिक पूर्णवेळ कार्यकर्त्यांचं जीवन किती कष्टाचं असतं, बेभरवशाचं असतं हे दाखवून देणारी आहे. अशा कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची ससेहोलपट कशी होते याचे प्रभावी चित्रण वाचकांच्या समोर उभे करणारी आहे.          या कादंबरीत चंद्रशेखर, रामा,  विलास, मांगले, सुशीला, विकास के. आर्, श्रीकांत, विजय व संजय अशी भरपूर पात्रे आली आहेत. ही सर्व पात्रे वाचकांशी बोलतात, आपल्या मनातील भाव वाचकांसमोर आपुलकीने व्यक्त करतात. एकूण १८ प्रकरणात विभागलेली ही कादंबरी ३५ वर्षापूर्वीची असूनही वाचकांना विचारांचं खाद्य देऊन खिळवून ठेवणारी आहे.       कादंबरीचे मुखपृष्ठ खूप आकर्षक व बोलकं आहे. बळी जाणाऱ्यांची वज्रमूठ पक्की आहे हेच मुखपृष्ठ सांगत आहे असे वाटते. उत्तम छपाई, सुबक बांधणी,सोपी भाषाशैली असलेली ही उत्कृष्ट  कादंबरी वाचकांच्या पसंतीस निश्चितपणे उतरेल अशी खात्री वाटते. सूज्ञ, रसिक वाचकांनी ही कादंबरी लवकरात लवकर वाचावी अशी नम्र विनंती.लेखकांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!! डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळीजयसिंगपूर.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!