पहिल्या डाकूराणीचा घुंगरांपासून बंदूकीपर्यंतचा प्रवास!
By SameerBapu on मन मोकळे from sameerbapu.blogspot.com
चंबळ खोऱ्यातील डाकूंचा इतिहास बाराव्या शतकापासून सांगितला जातो. मुघल काळातही या भागांत शांतता नव्हती. हे खोरे कित्येक वर्षांपासून विकास आणि इतर गोष्टींपासून उपेक्षितच राहिले. बाबरने चंबळ घाटीतील गुजर आणि जाट लोकांचे लुटारू तसेच दरोडेखोर (दस्यु) असे वर्णन केले होते. हे डाकू लोकांना लुटतात, चंबळ खोऱ्यातील बिहडमध्ये अदृश्य होतात, नंतर कधीच हाती येत नाहीत असे त्याने म्हटलेलं. ब्रिटिशकाळात वॉरेन हेस्टिंग्जने आदेश जारी केला होता की प्रत्येक डाकूला त्याच्याच गावात फासावर लटकवण्यात यावे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारचे गुलाम बनवण्यात यावे. स्वातंत्र्यपूर्व काळात चंबळच्या खोऱ्यात डाकूंची खूप दहशत होती. 1837 ते 1849 या काळात ब्रिटिशांनी डांकूचा नायनाट करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. चंबळच्या खोऱ्यातील डाकूंच्या समस्येसाठी केवळ भौगोलिक आकारमानच जबाबदार नसून या भागातील तत्कालीन सामाजिक परिस्थितीही जबाबदार होती. मध्यप्रदेश पोलिसांकडून 1955 च्या सुमारास राबविण्यात आलेल्या मोहिमेत विविध चकमकीत 74 डाकू मारले गेले तर 105 जणांना अटक करण्यात आली. पोलिसांचे 61 जवानही कामी आले होते, यावरून अंदाज यावा की तिथे कधी काळी किती मोठ्या प्रमाणात डाकू होते! यातीलच एक दस्युसुंदरी होती पुतलीबाई! पुतलीबाईची पावलं थिरकली की लोकांच्या काळजाचे ठोके वाढायचे. मृदू काया, काळेभोर डोळे, गौर वर्ण, उभट चेहरा असं तिचं देखणं रुपरंग होतं. तिच्या सौंदर्याच्या चर्चा चंबळच्या निर्जन भागातही रंगल्या. ती केवळ सुंदर नर्तिकाच नव्हती तर संगीताच्या तालावर विलक्षण नृत्यमग्न झालेली सौदामिनी होती! ती असं काही नाचायची की पाहणारा दंग होऊन एकटक बघत राही! चंबळमध्ये जिथे गोळ्यांच्या आवाजाशिवाय दुसरं काही ऐकू येत नव्हतं, तिथल्या रुक्ष वातावरणात या सुंदर मुलीच्या मोहिनीने अशी जादू निर्माण केली की सगळ्यांना तिच्या देखणेपणाची नशा चढली. तिचे खरे नाव गौहर बानो होते! तिचे बालपण चंबळच्या खेडोपाडयात नृत्यगाण्यात गेले असले तरी जेंव्हा ती तारुण्याच्या उंबरठ्यावर आली तेंव्हा तिच्या नृत्याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या होत्या. तिची देहयष्टी इतकी लवचिक होती की जणू एखादा सर्प आपला देह आवळतोय! असेही म्हटले जाते की तिच्या डोळ्याच्या बाहुलीच्या हालचालीनुरुप तिचे शरीर हलायचे आणि म्हणूनच गोहरच्या चाहत्यांनी तिला 'पुतली बाई' हे नवीन नाव दिलेलं! अशा तऱ्हेने बालपणीची गौहर तारुण्यात पुतलीबाई झाली, जी पुढे जाऊन चंबळची पहिली लेडी डकैत झाली.गौहर म्हणजेच पुतलीबाई हिचा जन्म 1926 मध्ये मुरैना येथील बारबाई गावातला. तिला संगीत, नृत्य आणि सौंदर्याचा वारसा तिच्या आईपासून मिळाला होता. तिची आई असगरबाई ह्या त्यांच्या काळात खूप सुंदर नर्तिका होत्या, पण पुतलीबाईने सौंदर्यात आपल्या आईला मागं टाकलं होतं. तिला एक भाऊ होता जो खूप उत्तम तबलावादन करायचा. तिला लहानपणापासूनच आपल्या भावाच्या तबल्याच्या तालावर नाचण्याची आवड होती. पुढे जाऊन आईने तिच्या या छंदास कुटुंबाच्या कमाईचे साधन बनवलं. केवळ चंबळमध्येच नव्हे तर आग्र्यातही तिच्या नृत्यसौंदर्याचे दाखले दिले जाऊ लागले. गावोगावी तिचा नाद घुमू लागला. विविध गावांत देखण्या पुतलीबाईंच्या नृत्य-संगीताचा फड पुन्हापुन्हा जरी आला तरी शेकडो लोक तिला पाहण्यासाठी पोहोचत. तिच्यावर पैशांचा पाऊस पडू लागला. तिचं नाचणं जसजसं घटत गेलं तसतसे तिची उपस्थिती असणाऱ्या यात्रांमधले गर्दीचे आकडे वाढत गेले. पुतलीबाईंच्या चाहत्यांमध्ये चंबळ आणि आग्रा येथील पोलिसांचाही समावेश होता हे विशेष होय! तिने चंबळच्या दऱ्याखोऱ्यात जणू रौनकच आणली होती. घरात आलेल्या बरकतीमुळे तिचे कुटुंबही खूप आनंदात होते. पुतली आपल्या नृत्यातून खूप कमावत होती, पण ती कमाई काही दिवसांचीच ठरली. कारण पुतलीबाईची चर्चा चंबळच्या खुंखार डाकूंपर्यंत पोहोचू लागली होती. पोलिसांसोबतच पुतलीच्या चाहत्यांमध्ये डकैतही सामील झाले!दरम्यान त्यावेळी चंबळच्या दऱ्याखोऱ्यात डाकू सुलतानचे नाव गाजत होते. चंबळच्या प्रत्येक गावात सुलतानच्या नावाची दहशत होती, त्यातच पुतलीबाईचे नाव सुलतानपर्यंत पोहोचले. अशी वदंता आहे की एकदा एका गावात पुतलीचा कार्यक्रम रंगात आला होता, तेव्हा डकैत सुलतानच तिथे पोहोचला. त्याला पाहूनच लोक थरथरू लागले. संगीतही जागीच थांबले मात्र पुतलीच्या पायात बांधलेल्या घुंगरांचा नाद काही थांबला नाही. पुतलीला पाहताच सुलतान तिच्या प्रेमात पडला. तिच्या सौंदर्याने त्याच्यावर असं गारुड केलं की तिला आपल्यासोबत घेऊन जाण्यास तो आतुर झाला. त्याने पुतलीला आपल्यासोबत येण्यास फर्मावले; तिने अवज्ञा केल्यास भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. इथूनच खेड्यातल्या एका सुंदर नर्तिकेची डाकू बनण्याची कहाणी सुरू झाली. गौहरच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली. 18-19 वर्षांची ती सुंदर मुलगी गावातून निघून थेट चंबळच्या बिहडमध्ये आली. आता ती फक्त डाकू सुलतानसाठी नाचणार होती. सुलतानसोबत राहताना हळूहळू ती त्याच्या प्रेमात पडत गेली. पुतलीबाई आपल्या अपत्याची आई होणार हे कळताच सुलतानही तिची काळजी घेऊ लागला. गर्भारपणाचे दिवस भरत आल्यावर सुलतानने तिला तिच्या गावी परत आणून सोडले. पुतलीबाई पुन्हा गावात आली खरी मात्र दरम्यानच्या काळात सगळंच बदललं होतं. लोकांनी विशेषत: पोलिसांनी तिचा छळ सुरू केला. डकैत सुलतानच्या नावाने ते तिलाच तडीपार करायचे. चौकशीच्या नावाखाली पोलीस तिला उचलून पोलीस ठाण्यात नेऊन तिला लुटत असत असे सांगितले जाते.पुतलीबाईने एका गोंडस मुलीला जन्म देईपर्यंत हे असेच चालू राहिले. कारण त्यानंतर पुतली आपल्या मुलीला तिच्या कुटुंबापाशी सोडून चंबळच्या खोऱ्यात परतली. याच काळात पुतलीमध्ये बदल झाला. तिला पोलिसांचा तिरस्कार वाटू लागला. तिला त्या सर्वांचा बदला घ्यायचा होता. बंदूक कशी चालवायची हे याच काळात सुलतानने तिला शिकवले. तिथली खडबडीत जंगलं तिला आता आवडू लागली होती. जिला कधीकाळी घुंगरु आवडत ती आता बंदुकीने लक्ष्यभेद करु लागली होती. आपल्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या पोलिसांना शिक्षा करणे हे तिचे उद्दिष्ट झाले होते कारण त्यांनी तिच्याच गावातच जितेपणी तिचा नरक बनवला होता. सुलतानच्या हातून तालिम घेऊन पुतलीबाई तयार झाली. मौका पाहून तिने घाव घातला. आपल्या अब्रूला हात घालणाऱ्या पोलीसांच्या घरी जाऊन तिने असा कहर केला की अख्ख्या चंबळमध्ये तिची दहशत पसरली. तिने 'त्या' पोलिसांची बोटे कापली, त्यांच्या बायकांचे कान कापले. पुतलीबाईने तिच्या इज्जतीचा अशा प्रकारे बदला घेतला की लोक भीतीने थरथरू लागले. खेड्यातली साधीभोळी गौहर आता चंबळची निष्ठुर डाकू पुतलीबाई झाली होती. सुलतान - पुतलीबाई दांपत्य म्हणजे चंबळमध्ये भीतीचे दुसरं नाव झालं!पन्नासच्या दशकात पोलिस आणि दरोडेखोरांच्या चकमकीच्या घटना अनेकदा चंबळच्या बातम्यांचा एक भाग असत. डाकू सुलतानसह पुतलीचे नाव त्यात नक्कीच समाविष्ट असायचे. दरम्यान, चंबळमध्ये आणखी एक डकैत लखनसिंग याचाही दबदबा होता. लखन बऱ्याचदा सुलतानसोबत मिळून काम करत असला पण प्रत्यक्षात तो सुलतानचा द्वेष करायचा. त्याला आपला प्रतिस्पर्धी मानायचा. संधी साधून त्याला सुलतानला संपवायचे होते. तो त्याच तयारीत असायचा. एका चकमकीदरम्यान लखनने सुलतानाला आपली शिकार बनवल्याचे सांगितले जाते. मात्र आपणच सुलतानला ठार मारल्याचा दावा पोलिसांनी केला होता! सुलतानसोबत असलेल्या पुतलीबाईला माहित होतं की त्याला पोलिसांनी मारलं नसून लखननेच त्याला मारलं होतं. या संदर्भात पुतलीबाईने तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहिलं होतं अशा आशयाच्या बातम्या तेंव्हा प्रसृत झाल्या होत्या. सुलतानच्या पश्चात टोळीत पुतलीबाई एकाकी पडली होती. याच टोळीतला एक सदस्य डाकू बाबू लोहार हा सुलतानच्या जागी सरदार (मुखिया) घोषित झाला. बाबू लोहारची नजर वाईट होती. त्याला देखण्या पुतलीचे वेध लागले होते. कसेही करुन हे पाखरु आपल्या कब्जात घ्यायचे हाच त्याचा ध्यास झाला होता. तो तिच्या भावनांशी खेळू लागला. पुतलीचे फक्त सुलतानवर प्रेम होते आणि त्याच्या मृत्यूनंतरही ती इतर कोणाचीही होऊ शकली नाही. पुतलीने बाबू लोहारचा सफाया करण्याचे ठरवले होते. एका पोलीस चकमकीदरम्यान संधीचा फायदा घेत पुतलीने आपल्याच टोळीचा म्होरक्या बाबू लोहारला यमसदनी पाठवलं! त्यानंतर पुतलीबाई तिच्या टोळीची प्रमुख झाली. टोळीतील निर्णय आता त्याच्या आदेशाने होऊ लागले. पोलीस सुद्धा तीस वर्षांच्या पुतलीबाईशी चार हात करायला हादरायचे. त्यांच्यातली रंजीश काही केल्या कमी होत नव्हती. सतत चकमकी घडत असत. अशाच एका चकमकीत पुतलीबाईला तिचा एक हात गमवावा लागला. तरीही तिच्या खुनशी सौंदर्याची दहशत वाढतच गेली. भिंड, मुरैना, शिवपुरी, ग्वाल्हेर भागात पुतलीबाईंचे नाव पन्नासच्या दशकात कर्णोपकर्णी झालं होतं. 1958 च्या जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत पोलिसांना खबर मिळाली की डकैत लखनसिंग कोठार गावात हल्ला करणार आहे. पोलिस तिथे पोहोचले. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला पण पोलिसांचा सामना लखनशी न होता पुतलीबाईशी झाला! चंबळची फर्स्ट लेडी डकैत तिच्या टोळीसह शस्त्रसज्ज पोलिसांशी भिडली! तिने प्रयत्नांची शर्त केली, प्राणाची बाजी लावली. त्यात तिला गोळी लागली. या चकमकीत पुतलीबाईसह तिचे नऊ साथीदार मारले गेले.वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी पुतलीबाईचा अंत झाला! इतक्या कोवळ्या वयात पुतलीबाईने चंबळच्या डोंगराळ रुक्ष प्रदेशात कधी आपल्या घुंगरांनी तर कधी बंदुकीच्या आवाजाने आपलं नाव अजरामर केलं! पुतलीच्या मृत्यूसमयी तिची मुलगी तन्नो ही खूप लहान होती. पुतलीचा मृतदेह पुतलीची आई असगरबाई यांच्याकडे सोपवण्यात आला. चिमुरड्या तन्नोने आपल्या आईचे अंतिम संस्कार केले नि मग कुठे त्या थकल्या जीवाची तगमग थांबली! देखणं असणं, कलागुण अवगत असणं या गोष्टी स्त्रीसाठी बऱ्याचदा शाप ठरतात नि मग त्यांची फरफट सुरू होते जी मरेपर्यंत जारी असते, कारण समाज नावाचा चांडाळ मूकदर्शक होऊन तमाशा पाहत असतो! पूर्वप्रसिद्धी दैनिक पुण्यनगरी दि. 15/01/2023