नाताळ ख्रिसमस - विशेष लेख

By jyubedatamboli on from https://jyubedatamboli.blogspot.com

नाताळ ख्रिसमस: विशेष लेख✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळीफोटो साभार: गूगल              नाताळ  किंवा ख्रिसमस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा सण. प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म ही दंतकथा किंवा काल्पनिक गोष्ट नसून एक ऐतिहासिक घटना आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. पवित्र शास्त्राप्रमाणे येशू ख्रिस्त हे देवाचे, जिवंत देवाचे पुत्र आहेत.       या देवाच्या पुत्राला या भूतलावर मनुष्याचा जन्म का घ्यावा लागला ? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्रातील पहिलं पुस्तक अर्थात उत्पत्तीच्या पुस्तकात पहावे लागेल.       उत्पत्तीच्या पुस्तकात असे नमूद केलेले आहे की, देवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. आकाश, पृथ्वी, समुद्र, नद्या, डोंगर, झाडी, पशू, पक्षी, पाण्यातील जीव इत्यादी आणि सर्वात शेवटी त्याने आदाम आणि इव्ह अर्थातच पुरुष व स्त्री यांची निर्मिती केली. देवाने या पुरुष आणि स्त्रीला ऐदेन नावाच्या बागेत ठेवले होते. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणिमात्र यांच्यावर देवाने मनुष्याला अधिकार दिला होता. बागेतील वाट्टेल त्या झाडाचे फळ खाण्याची मुभा होती पण 'बऱ्या वाईटचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको' अशी देवाने आदामाला आज्ञा दिली होती. 'ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील' अशी ताकीद देवाने आदामाला दिली होती. पुढे उत्पत्तीच्या पुस्तकात म्हटले आहे की, सर्प जो सैतानाचा प्रतीक आहे, ज्याच्या आमिषाला बळी पडून स्त्रीने, परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन करून, त्या झाडाचे फळ खाल्ले व आदामाला ही ते खाण्यास भाग पाडले. त्यांच्या या कृतीमुळे, पाप या जगात आले व मनुष्य देवापासून दूर झाला. देवामध्ये व मनुष्यामध्ये या पापामुळे एक दरी निर्माण झाली. ( उत्पती३ः१७-१९)       देव जो पवित्र आहे, प्रेमळ आहे, कनवाळू आहे त्याची इच्छा होती की, मनुष्याबरोबर समेट करावा. यासाठी सर्वप्रथम पापाची खंडणी गरजेची होती. पापाचे वेतन मरण आहे. रक्त हे जीवनाचं प्रतीक आहे. रक्ताशिवाय जिवंत राहता येत नाही. अर्थातच पापक्षमेसाठी रक्तार्पण होऊ लागलं. प्राण्यांना व पक्षांना बळी देण्याची प्रथा सुरू झाली. परंतु या प्रथेने पापाचा नायनाट होत नव्हता तर पापावर तात्पुरते पांघरूण घातले जात असे आणि मनुष्य पुन्हा पुन्हा पाप करत असे व निष्पाप जनावरांचा व पक्षांचा बळी जात असे. देवाला या गोष्टीचा वीट आला. पापांच्या क्षालनासाठी पुरेपूर परिपूर्ण व कायमस्वरूपी खंडणी गरजेची होती अनिवार्य होती आणि म्हणून गलतीकारास पत्र ४ः४ मध्ये म्हटले आहे, 'काळाची पूर्णता झाली तेंव्हा देवाने पुत्राला पाठवले.' तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा होता. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म एका विशिष्ट उद्देशासाठी झाला होता. ख्रिस्ताचा जन्म ख्रिस्ती धर्म स्थापित करण्यासाठी नव्हे तर पापात गुरफटलेल्या समस्त मानव जातीला पापापासून सुटका करण्यासाठी, पापाच्या शापापासून त्यांना बंधमुक्त करण्यासाठी, लोकांना क्षमेचा अनुभव देऊन सार्वकालिक जीवनाची आशा देण्याकरिता ख्रिस्ताचा जन्म झाला होता.     ख्रिस्ताचा जन्म झाला तेंव्हाच त्याने मोठेपणी मानव जातीच्या पापासाठी वधस्तंभावर बलिदान देणे निश्चित होते. मनुष्याच्या पापासाठी एका निष्पाप मनुष्याचाच बळी आवश्यक होता आणि यासाठी देवाला त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवावं लागलं. त्या देवाच्या पुत्राचा जन्म आपण नाताळ किंवा ख्रिसमस म्हणून जगभर साजरा करतो.ख्रिसमसचा केंद्रबिंदू:       आज ख्रिसमस साजरा करताना लोक ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, ख्रिसमस केक इत्यादि गोष्टींचा समावेश करतात परंतु आपण सर्वांनी ख्रिसमसचा केंद्रबिंदू कधीच विसरता कामा नये आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला जगाचा प्रकाश म्हणतो (योहान८:१२) प्रकाश हा प्रत्येक सणाचा अविभाज्य हिस्सा आहे आणि ख्रिसमसचा प्रकाश म्हणजे स्वतः प्रभू येशू आणि प्रभू येशू त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनादेखील जगाचा प्रकाश म्हणतो. मत्तय ५:१४,१६ मध्ये ते म्हणतात, "तुम्ही प्रकाश आहात त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा."ख्रिस्ती जीवनशैली:       ख्रिस्ती ही एक जीवनशैली आहे. या ख्रिसमसच्या दिवशी आपण सर्वांनी हे लक्षात ठेऊया की, ख्रिस्त आपल्याला धर्मांतर करायला शिकवत नाही तर कुठल्याही गोष्टींची अपेक्षा न ठेवता सत्कर्म करा असे अवाहन करतो. आपल्याला जर ख्रिसमस खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल तर आपण इतरांना क्षमा करू या, दुःखितांचे अश्रू पुसूया आणि सर्वांशी प्रेमाने आणि शांतीने वागून हा ख्रिसमस साजरा करू या. गरजू लोकांना मदतीचा हात देवू या. हे नेहमी लक्षात ठेवू या की, ख्रिसमसच्या दिवशी देवाचा पुत्र मनुष्य झाला जेणेकरुन मनुष्याच्या पुत्रांना देवाचे पुत्र होण्याचे सौभाग्य मिळावे.सर्वांना ख्रिसमस सणाच्या हार्दिक शुभेच्छा.....।
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!