नर्सचे समर्पण
By vtavate on मन मोकळे from vivektavate.blogspot.com
नर्सचे समर्पण गेल्या वर्षापासून डॉक्टर व नर्स रात्रंदिवस अथक रुग्णांची सेवा करत करोनाच्या ससंर्गाशी लढत आहेत. आरोग्य कर्मचार्यांवर प्रचंड कामाचा ताण आहे.रुग्णांच्या आरोग्य सेवेसह चाचण्या घेणे व लस देणे ही कामेही सुरु आहेत. आपले कर्तव्य बजावताना कित्येक डॉक्टर व नर्सेचा मृत्यु झाला आहे.सीमेवरील सैनिकाप्रमाणे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कार्यरत आहेत. छत्तीसगडच्या काबीरधाम जिल्ह्यातील लिमोमधून एक घटना समोर आली आहे. एक नर्स आपल्या आयुष्याची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत होती. ९ महिन्यांची गर्भवती असूनही, ती कोविड वॉर्डमध्ये ड्यूटी करत होती. परंतु याच काळात तिला करोनाचा संसर्ग झाला. एका मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला.खूप वाईट झाले. या नर्सने तिचा नवरा सांगत असताना देखील सुट्टी का घेतली नाही? ९ महिन्यांच्या गर्भवती असूनही कोविड वॉर्डमध्ये का ड्यूटी करत होती? गर्भवती असल्याने दोन जीवाना धोका होता ते तिला कळले नसेल का? तिने हा धोका का पत्करला असेल? करोनापासून रुग्णांना वाचवत होती पण स्व:तला वाचवू शकली नाही. तिच्या मुलीला आता आई दिसणार नव्हती.त्या मुलीला आईची माया मिळणार नव्हती. नवजात बालकाची आई त्याला कायमची सोडून गेल्याचे मोठे दु:ख आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक होती, या लाटेत अनेकांनी आपले आप्त तर गमावलेच, पण काही मातांना त्यांची जन्माला न आलेली बाळंही गमवावी लागली. गरोदरपणाच्या काळात आई जर कोरोना पॉझिटीव्ह निघाली तर आरोग्यविषयक अनेक समस्या उभ्या राहू शकतात. कोव्हिडच्या काळात नऊ महिन्यांचा काळ काढणं त्या महिलेसाठी, तिच्या घरच्यांच्यासाठी आणि तिच्या डॉक्टरांसाठी सगळ्यांसाठी सत्वपरिक्षेचा काळ आहे.गर्भवती असताना देखील आयुष्याची पर्वा न करता परिचारिका रुग्णांसाठी काम करीत आहेत याचे कौतुक आहे.त्या जसं पोटातल्या बाळाशी कनेक्ट होतात,तसंच रुग्णांशीही कनेक्ट झालेल्या असतात. गर्भवती असताना पीपीई किटमध्ये राहून करोना रुग्णांची सेवा करणे किती कठीण आहे.आरोग्य विभागाने गर्भवती असलेल्या परिचारिकांना रुग्ण सेवा देणे बंद केले पाहिजे.