चंबळच्या खोऱ्यातला महिला डाकुंचा थरार ..

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

आज एक जानेवारी आहे. आजघडीला चंबळचे खोरे शांत आहे. मात्र बरोबर अठरा वर्षांपूर्वी 5 जानेवारी 2005 रोजी इथे अखेरची मोठी चकमक झडली होती. त्या रात्री डाकू रामवीर गुर्जरने आपल्याच गँगचा म्होरक्या चंदन यादववर गोळीबार करुन ठार मारले होते. चंबळच्या खोऱ्यात अनेक हत्या झाल्यात, डाके पडलेत, लूटमार झालीय, काही प्रसंगी स्त्रियांवर हात टाकले गेलेत मात्र एका स्त्रीच्या प्राप्तीसाठी आपल्याच गॅंगच्या लीडरला खलास करण्याचे कटकारस्थान क्वचित घडलेय. रामवीरने जिच्यासाठी ही हत्या केली तिची कथा ही जणू चंबळचीच कथा होय! चंबळचे नाव घेताच हिंदी सिनेमातले डाकूपट आठवतात, हिंदी साहित्यातल्या दरोडेखोर समोर येतात. चंबळ म्हटले की दुर्गम प्रदेश, डोंगरदऱ्यांचे चित्र डोळ्यांपुढे तरळते. बिहड शब्द कानी येतो. बिहड म्हणजे जमिनीचे उंचसखल असणारे रुक्ष निकृष्ठ भूस्वरूप, चंबळच्या कृपेने हा शब्द जगभर ज्ञात झाला! चंबळ ही यमुनेची उपनदी असून मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या राज्यांतून वाहते. या तिन्ही राज्यांच्या सीमा चंबळच्या जंगलाला लागून आहेत. मध्यप्रदेशातील 'जानापाव' येथे विंध्य पर्वतात तिचा उगम असून चंबळ नदीची एकूण लांबी 960 कि.मी. आहे. चंबळ क्षेत्रातील लोकसंख्या पन्नास लाखाच्या आसपास आहे. चंबळच्या घाटीत असणाऱ्या ओसाड उष्ण जंगलात बिहडमध्ये आश्रय घेऊन राहणार्‍या डाकूंनि चंबळची कुप्रसिद्ध ओळख निर्माण केली असं म्हणणं या नदीचा अवमान ठरेल आणि सत्य पुन्हा एकदा दडपले जाईल! 1960 च्या दशकात चंबळचे खोरे मध्यप्रदेशातच नव्हे तर संपूर्ण भारतात कुप्रसिद्ध होते. तेव्हा या खोऱ्यात डाकूंच्या अनेक टोळ्या होत्या. त्यांच्या एकमेकांमध्ये लढाया व्हायच्या. रोज खून, लुटालूट होई आणि बंदुकीच्या गोळ्यांचा पाऊस पडत असे. इथले लोक अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगायचे. चंबळचे नाव गत शतकात बदनाम झालेय असे काही नाही. यमुनेच्या पाठीकडील भागांत जे विस्तीर्ण भकास बिहड आहेत त्यांच्या मधोमध चंबळचे देखणे नितळ पात्र आहे. आश्चर्य वाटेल की उत्तरेकडील ही एकमेव उपनदी आहे जी प्रदूषणमुक्त आहे परंतु मानव किंवा एखादे जनावरही या नदीचे पाणी पित नाही. गंगा, यमुना, कृष्णा, क्षिप्रा यांसारख्या अनेक नद्यांची भारतात पूजा होते. देशात अशी कोणतीच नदी नसावी की जिची पूजाअर्चना होत नाही अपवाद फक्त चंबळचा असावा! कारण चंबळला एक शापित नदी म्हणून ओळखले जाते. चंबळचा संदर्भ पुराणकाळातही आढळतो. महाभारताशी तिचे नाते आहे. मुरैनाच्या नजीक चंबळच्या काठावर शकुनीने पांडवांना द्युतामध्ये हरवले होते. याच ठिकाणी द्रौपदीच्या चिरहरणाचे आदेश दिले गेले होते. म्हणून चिडलेल्या द्रौपदीने या नदीला शाप दिला होता. अजूनही हा शाप प्रमाण मानून या नदीची पूजा केली जात नाही किंवा तिचे पाणी पिले जात नाही. या कथित शापामुळेच या नदीच्या काठची लोकवस्ती अतिशय कमी आहे, म्हणूनच ही नदी अतिशय स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आहे. या परिसरात चंबळ हा पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे आणि जो बऱ्याचदा कोरडा पडतो त्यामुळे इथे सगळ्याच डाकूंना स्थान मिळाले नाही. इथे आपली सत्ता चालावी म्हणून सातत्याने संघर्ष होत राहिले त्याला कारण हिचे दर दुष्काळात आकसत जाणारे पात्र! चंबळच्या याच वेदनेशी मिळतीजुळती कथा रेणू यादव तिच्या आयुष्यात जगलीय. निळी डेनिम, पांढरा शर्ट, स्पोर्ट शूज व कपाळावर लाल टिळा. ही तिची ओळख होती. दस्यु सुंदरी या नावाने ती फेमस होती. चंबलच्या दऱ्याखोऱ्यांत तिची दहशत होती. ती इतकी देखणी होती की तिचे सौंदर्यच तिच्या हिताआड आले. तिच्या प्राप्तीसाठी रक्ताचे पाट वाहणारे डाकू परस्परांचा जीव घेण्यास आतुर झाले होते. हेमांगी काया, नितळ, निरागस नि सुंदर चेहरा, पाच फूट आठ इंच उंची, लांब घनदाट काळे केस असं तिचं रुपडं होतं. पाहणाऱ्यावर तिची मोहिनी पडे. पाच बहिणींतली सर्वात थोरली होती. युपीच्या औरेया जिल्ह्यातील जमालीपूर गावातला तिचा जन्म. तिचे वडील विद्याराम यादव अत्यंत गरीब सालदार कष्टकरी होते. खाणारी तोंडे पुष्कळ असल्याने संसार कसाबसा चालत होता. तरीही त्यांनी रेणुला शिकवले. तिला पुस्तकांची आवड होती. शिकून सवरून वडिलांना मदत करण्याचे तिचे स्वप्न होते. पण तिच्या नशिबात दुसरेच काहीतरी होते. चंबळचेही असेच होते! द्रौपदीने कथित शाप देण्याआधी ती निहायत खास होती! 29 नोव्हेंबर 2003 रोजी सकाळी रेणू तिच्या मैत्रिणींसोबत शाळेत जात असताना चंबलचा डाकू चंदन यादवने तिला पाहिले. तिचे सीधेसाधे वर्तन आणि देखणंपण यामुळे तो अक्षरशः बहकला! थेट तिचे अपहरणच केले. संध्याकाळ होऊनही रेणू घरी न आल्यामुळे तिचे कुटुंब काळजीत पडले. रेणूचे वडील विद्याराम यांनी पोलिसांत तक्रार दखल केली. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर डाकू चंदन यादवने तिच्या वडिलांकडे तिच्या मोबदल्यात दहा लाखांची खंडणी मागितली. रेणूचे वडिल खचून गेले. चार गरीब मुलींचा तो बाप इतकी रक्कम कुठून आणणार होता? अशक्य होतं हे! काही केल्या त्यांची जुळवाजुळव होत नव्हती. दरम्यान ते रोजच पोलिसचौकीच्या पायऱ्या चढत. मात्र हाती काहीच लागले नाही. शाळेला निघालेली ती पोर थेट डाकूंच्या अड्ड्यावर पोहोचली. त्यांच्या टोळीत ती एकमेव स्त्री होती. आपली सुटका व्हावी म्हणून तिने मिनतवाऱ्या केल्या पण फरक पडला नाही. सुरुवातीच्या दिवसांत तिच्यावर घोर अत्याचार झाले. मारझोडीपासून ते उपाशी ठेवण्यापर्यंतचे छळ केले गेले. ज्या पद्धतीने एखाद्या स्त्रीला इच्छेविरुद्ध बाजारात बसवले जाते तसे तिच्यामर्जीविरुद्ध तिच्या हाती बंदूक ठेवली गेली. शस्त्र चालवण्यासाठी दबाव आणला गेला. तिच्या विरोधास न जुमानता तिच्यावर जबरदस्ती केली गेली. कुणीतरी आपली सुटका करेल या आशेवर ती दिवस काढत होती. मात्र तसे घडले नाही. वडील, पोलीस कुणीच आलं नाही मग चंबळच्या कुशीत जगण्याशिवाय पर्याय उरला नाही. यातूनच डाकू रेणू यादव घडली! द्रोपदीच्या अन्यायप्रसंगी मौन राहण्याची साक्षीदार असल्याची चंबळला जशी शिक्षा मिळाली तशीच सजा रेणू यादवला मूक राहून अन्याय साहण्यापायी मिळाली. चंदन यादवने स्वतःला दस्यु सम्राट घोषित केले होते आता रेणू यादव त्याच्या गँगची दस्यु सुंदरी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्या दिवसांत डाकू चंदन यादव त्याच्या गँगची राजस्थान, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील काही गावांत दहशत होती. सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर इतर डाकूही चंदन यादवला घाबरत होते. रेणूच्या नावानेही एव्हाणा अनेक लुटमार, अपहरण, खंडणी सारखे गुन्हे दाखल झाल होते. पुढे जाऊन ती चंदन यादवच्या मुलीची आईही झाली होती. पण तिच्या समस्या काही सुटल्या नव्हत्या. एव्हाना तिच्या सौंदर्याची दास्तान चौदिशेला आकळली. चंदन यादव प्रमाणेच इतर डाकूंनाही ती हवी होती. पण चंदनच्या दहशतीमुळे तिच्यावर हात टाकण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. अखेर रामवीर गुर्जरने हे काम पार पाडले! त्याने चंदनची हत्त्या केली. जवळपास एका आठवड्याने रामवीर गुर्जरने रेणूवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी रेणूने रामवीरच्याच सेल्फ लोडिंग रिव्हॉल्वरने त्याला गोळ्या घातल्या. चंदन यादवचा पूर्वीच मृत्यू झाला होता. आता रामवीर यादवलाही तिने गोळ्या घातल्या होत्या. त्यामुळे ती संधी साधून जंगलात पळून गेली. सात दिवस जंगलात भटकल्यानंतर ती आपल्या घरी परतण्यात यशस्वी झाली! विशेष बाब म्हणजे तेंव्हा ती गर्भवती होती! आत्मसमर्पणासाठी तिने थेट इटावा पोलिसांशी संपर्क केला नि इथेच घात झाला. दरोडेखोरांच्या तावडीतून सुटलेल्या रेणूसोबत पोलिसांचे वर्तन भयंकरच होते! 14 फेब्रुवारी 2005 रोजी इटावाचे तत्कालीन एसएसपी दलजीत चौधरी कोतवाली प्रभारींसोबत रेणूच्या घरी पोहोचले आणि तिला सुरक्षिततेचे आश्वासन दिल्यानंतर तिला कोतवालीत आणले. तेथे पोहोचताच तिला अटक करण्यात येऊन जालौन, इटावा, कानपूर देहातसह अनेक जिल्ह्यांमध्ये चंदन यादववर नोंदवलेले सर्व गुन्हे तिच्या नावावर दाखल करण्यात आले. योग्य त्या पद्धतीने सुटका होण्याऐवजी तिची रवानगी थेट तुरुंगात केली गेली. हे धक्कादायक होतं! आधी डाकूंशी आणि नंतर समाजाशी लढणाऱ्या रेणूला आता कायद्याचा सामना करायचा होता! तिने तो पुरजोर ताकद लावून केला. रेणूचे मामा शिवसिंग, वायुसेनेचे माजी सैनिक आणि रमाबाई नगरचे जिल्हा पंचायत सदस्य यांनी आपल्या भाचीला कायदेशीर लढाईत पूर्ण पाठिंबा दिला. न्यायालयाने रेणूला सर्व 17 खटल्यांतून दोषमुक्त केले. या प्रकरणी पोलिसांची कारवाई अत्यंत बेजबाबदार असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने पोलिसांना खडसावले. सात वर्षे चाललेली न्यायालयीन लढाई जिंकून रेणूची 29 मे 2012 रोजी लखनौच्या नारी बंदी निकेतनमधून सुटका झाली. दरम्यान तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. कारावासातून मुक्त होताच उर्वरित आयुष्य सुलभ नव्हतं. रामवीरला गोळ्या घालूनदेखील त्याच्या टोळीचे अस्तित्व शाबूत राहिले होते हे रेणूला अटकेनंतर काही महिन्यांनी कळले होते मात्र ती डगमगली नव्हती. सुटकेनंतर तिने आपले मांडलिकत्व स्वीकारावे म्हणून रामवीरच्या टोळीने तिच्यावर दडपण आणले. खलास करण्याच्या धमक्या दिल्या मात्र रेणूने त्यास भीक घातली नाही. तिने यूपीमधील तत्कालीन एसपी सरकारकडे आर्जव केलं, सुरक्षा मागितली. अखिलेश यादवांनी तिला सुरक्षा बहाल केली. तिला बिहडमध्ये जायचे नव्हते. कोणत्याही स्थितीत पुन्हा जंगलात परतण्याची इच्छा नव्हती. आपल्या मुलीचे चांगल्या पद्धतीने संगोपन व्हावे, आपल्या आयुष्याची सावली तिच्यावर पडू नये यासाठी तिने आपल्या मुलीलाही आपल्या आईकडे पाठवून दिले. रेणू यादवच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण ती खचली नाही. तिची आपल्यासारख्या महिलांसाठी कार्य करण्याची इच्छा आहे. हा मार्ग तिला राजकारणाकडे घेऊन गेला तर तिची राजकारणातही उतरण्याची इच्छा आहे. निवडणूक लढवून तिने स्थानिक लोकप्रतिनिधीत्वही मिळवले. मात्र समाजाने तिला पुरते स्वीकारले नाही. आपल्या जन्मगावी ती आता शांततेत आयुष्य जगतेय. सीमा परिहार, नीलम गुप्ता, सरला जाटव, सीमा यादव यांच्या जीवनकथा कमी अधिक फरकाने अशाच आहेत. चंबळने त्यांना नाव दिले मात्र त्यांचे चरित्र दागदार केले, कथित रित्या त्यांचे शील लुटले गेले तरी त्या पवित्रच होत्या कारण त्यांचे मन कधीच भ्रष्ट झाले नव्हते. समाजाने त्यांना कधीही अंतःकरणापासून पुरते स्वीकारले नाही मग त्यांना उचित मानसन्मान मिळण्याची गोष्ट दूरच! चंबळचेही असेच झालेय, तिला नावलौकिक आहे मात्र तिला सन्मान लाभला नाही की तिचे पूजन होत नाही. भारतीय स्त्री आणि चंबळ यांच्यातले हे साम्य विलक्षण आहे! चंबळच्या उर्वरित कन्यांचा आलेख पुढील भागात. तोवर अवांतर वाचत राहूयांत आणि जाणिवा समृद्ध करुयांत! - समीर गायकवाडपूर्वप्रसिद्धी दैनिक पुण्यनगरी दि. 01/01/2023__________________________पहिल्या डाकूराणीचा घुंगरांपासून बंदूकीपर्यंतचा प्रवास! -चंबळ खोऱ्यातील डाकूंचा इतिहास बाराव्या शतकापासून सांगितला जातो. मुघल काळातही या भागांत शांतता नव्हती. हे खोरे कित्येक वर्षांपासून विकास आणि इतर गोष्टींपासून उपेक्षितच राहिले. बाबरने चंबळ घाटीतील गुजर आणि जाट लोकांचे लुटारू तसेच दरोडेखोर (दस्यु) असे वर्णन केले होते. हे डाकू लोकांना लुटतात, चंबळ खोऱ्यातील बिहडमध्ये अदृश्य होतात, नंतर कधीच हाती येत नाहीत असे त्याने म्हटलेलं. ब्रिटिशकाळात वॉरेन हेस्टिंग्जने आदेश जारी केला होता की प्रत्येक डाकूला त्याच्याच गावात फासावर लटकवण्यात यावे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारचे गुलाम बनवण्यात यावे. स्वातंत्र्यपूर्व काळात चंबळच्या खोऱ्यात डाकूंची खूप दहशत होती. 1837 ते 1849 या काळात ब्रिटिशांनी डांकूचा नायनाट करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. चंबळच्या खोऱ्यातील डाकूंच्या समस्येसाठी केवळ भौगोलिक आकारमानच जबाबदार नसून या भागातील तत्कालीन सामाजिक परिस्थितीही जबाबदार होती. मध्यप्रदेश पोलिसांकडून 1955 च्या सुमारास राबविण्यात आलेल्या मोहिमेत विविध चकमकीत 74 डाकू मारले गेले तर 105 जणांना अटक करण्यात आली. पोलिसांचे 61  जवानही कामी आले होते, यावरून अंदाज यावा की तिथे कधी काळी किती मोठ्या प्रमाणात डाकू होते! यातीलच एक दस्युसुंदरी होती पुतलीबाई!   पुतलीबाईची पावलं थिरकली की लोकांच्या काळजाचे ठोके वाढायचे. मृदू काया, काळेभोर डोळे, गौर वर्ण, उभट चेहरा असं तिचं देखणं रुपरंग होतं. तिच्या सौंदर्याच्या चर्चा चंबळच्या निर्जन भागातही रंगल्या. ती केवळ सुंदर नर्तिकाच  नव्हती तर संगीताच्या तालावर विलक्षण नृत्यमग्न झालेली सौदामिनी होती! ती असं काही नाचायची की पाहणारा दंग होऊन एकटक बघत राही! चंबळमध्ये जिथे गोळ्यांच्या आवाजाशिवाय दुसरं काही ऐकू येत नव्हतं, तिथल्या रुक्ष वातावरणात या सुंदर मुलीच्या मोहिनीने अशी जादू निर्माण केली की सगळ्यांना तिच्या देखणेपणाची नशा चढली. तिचे खरे नाव गौहर बानो होते! तिचे बालपण चंबळच्या खेडोपाडयात नृत्यगाण्यात गेले असले तरी जेंव्हा ती तारुण्याच्या उंबरठ्यावर आली तेंव्हा तिच्या नृत्याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या होत्या. तिची देहयष्टी इतकी लवचिक होती की जणू एखादा सर्प आपला देह आवळतोय! असेही म्हटले जाते की तिच्या डोळ्याच्या बाहुलीच्या हालचालीनुरुप तिचे शरीर हलायचे आणि म्हणूनच गोहरच्या चाहत्यांनी तिला 'पुतली बाई' हे नवीन नाव दिलेलं!  अशा तऱ्हेने बालपणीची गौहर तारुण्यात पुतलीबाई झाली, जी पुढे जाऊन चंबळची पहिली लेडी डकैत झाली.गौहर म्हणजेच पुतलीबाई हिचा जन्म 1926 मध्ये मुरैना येथील बारबाई गावातला. तिला संगीत, नृत्य आणि सौंदर्याचा वारसा तिच्या आईपासून मिळाला होता. तिची आई असगरबाई ह्या त्यांच्या काळात खूप सुंदर नर्तिका होत्या, पण पुतलीबाईने सौंदर्यात आपल्या आईला मागं टाकलं होतं. तिला एक भाऊ होता जो खूप उत्तम तबलावादन करायचा. तिला लहानपणापासूनच आपल्या भावाच्या तबल्याच्या तालावर नाचण्याची आवड होती. पुढे जाऊन आईने तिच्या या छंदास कुटुंबाच्या कमाईचे साधन बनवलं. केवळ चंबळमध्येच नव्हे तर आग्र्यातही तिच्या नृत्यसौंदर्याचे दाखले दिले जाऊ लागले. गावोगावी तिचा नाद घुमू लागला. विविध गावांत देखण्या पुतलीबाईंच्या नृत्य-संगीताचा फड पुन्हापुन्हा जरी आला तरी शेकडो लोक तिला पाहण्यासाठी पोहोचत. तिच्यावर पैशांचा पाऊस पडू लागला. तिचं नाचणं जसजसं घटत गेलं तसतसे तिची उपस्थिती असणाऱ्या यात्रांमधले गर्दीचे आकडे वाढत गेले. पुतलीबाईंच्या चाहत्यांमध्ये चंबळ आणि आग्रा येथील पोलिसांचाही समावेश होता हे विशेष होय! तिने चंबळच्या दऱ्याखोऱ्यात जणू रौनकच आणली होती. घरात आलेल्या बरकतीमुळे तिचे कुटुंबही खूप आनंदात होते. पुतली आपल्या नृत्यातून खूप कमावत होती, पण ती कमाई काही दिवसांचीच ठरली. कारण पुतलीबाईची चर्चा चंबळच्या खुंखार डाकूंपर्यंत पोहोचू लागली होती. पोलिसांसोबतच पुतलीच्या चाहत्यांमध्ये डकैतही सामील झाले!दरम्यान त्यावेळी चंबळच्या दऱ्याखोऱ्यात डाकू सुलतानचे नाव गाजत होते. चंबळच्या प्रत्येक गावात सुलतानच्या नावाची  दहशत होती, त्यातच पुतलीबाईचे नाव सुलतानपर्यंत पोहोचले. अशी वदंता आहे की एकदा एका गावात पुतलीचा कार्यक्रम रंगात आला होता, तेव्हा डकैत सुलतानच तिथे पोहोचला. त्याला पाहूनच लोक थरथरू लागले. संगीतही जागीच थांबले मात्र पुतलीच्या पायात बांधलेल्या घुंगरांचा नाद काही थांबला नाही. पुतलीला पाहताच सुलतान तिच्या प्रेमात पडला. तिच्या सौंदर्याने त्याच्यावर असं गारुड केलं की तिला आपल्यासोबत घेऊन जाण्यास तो आतुर झाला. त्याने पुतलीला आपल्यासोबत येण्यास फर्मावले; तिने अवज्ञा केल्यास भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. इथूनच खेड्यातल्या एका सुंदर नर्तिकेची डाकू बनण्याची कहाणी सुरू झाली. गौहरच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली. 18-19 वर्षांची ती सुंदर मुलगी गावातून निघून थेट चंबळच्या बिहडमध्ये आली. आता ती फक्त डाकू सुलतानसाठी नाचणार होती. सुलतानसोबत राहताना हळूहळू ती त्याच्या प्रेमात पडत गेली. पुतलीबाई  आपल्या अपत्याची आई होणार हे कळताच सुलतानही तिची काळजी घेऊ लागला. गर्भारपणाचे दिवस भरत आल्यावर सुलतानने तिला तिच्या गावी परत आणून सोडले. पुतलीबाई पुन्हा गावात आली खरी मात्र दरम्यानच्या काळात सगळंच बदललं होतं. लोकांनी विशेषत: पोलिसांनी तिचा छळ सुरू केला. डकैत सुलतानच्या नावाने ते तिलाच तडीपार करायचे. चौकशीच्या नावाखाली पोलीस तिला उचलून पोलीस ठाण्यात नेऊन तिला लुटत असत असे सांगितले जाते.पुतलीबाईने एका गोंडस मुलीला जन्म देईपर्यंत हे असेच चालू राहिले. कारण त्यानंतर पुतली आपल्या मुलीला तिच्या कुटुंबापाशी सोडून चंबळच्या खोऱ्यात परतली. याच काळात पुतलीमध्ये बदल झाला. तिला पोलिसांचा तिरस्कार वाटू लागला. तिला त्या सर्वांचा बदला घ्यायचा होता. बंदूक कशी चालवायची हे याच काळात सुलतानने तिला शिकवले. तिथली खडबडीत जंगलं तिला आता आवडू लागली होती. जिला कधीकाळी घुंगरु आवडत ती आता बंदुकीने लक्ष्यभेद करु लागली होती. आपल्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या पोलिसांना शिक्षा करणे हे तिचे उद्दिष्ट झाले होते कारण त्यांनी तिच्याच गावातच जितेपणी तिचा नरक बनवला होता. सुलतानच्या हातून तालिम घेऊन पुतलीबाई तयार झाली. मौका पाहून तिने घाव घातला. आपल्या अब्रूला हात घालणाऱ्या पोलीसांच्या घरी जाऊन तिने असा कहर केला की अख्ख्या चंबळमध्ये तिची दहशत पसरली. तिने 'त्या' पोलिसांची बोटे कापली, त्यांच्या बायकांचे कान कापले. पुतलीबाईने तिच्या इज्जतीचा अशा प्रकारे बदला घेतला की लोक भीतीने थरथरू लागले. खेड्यातली साधीभोळी गौहर आता चंबळची निष्ठुर डाकू पुतलीबाई झाली होती. सुलतान - पुतलीबाई दांपत्य म्हणजे चंबळमध्ये भीतीचे दुसरं नाव झालं!पन्नासच्या दशकात पोलिस आणि दरोडेखोरांच्या चकमकीच्या घटना अनेकदा चंबळच्या बातम्यांचा एक भाग असत. डाकू सुलतानसह पुतलीचे नाव त्यात नक्कीच समाविष्ट असायचे. दरम्यान, चंबळमध्ये आणखी एक डकैत लखनसिंग याचाही दबदबा होता. लखन बऱ्याचदा सुलतानसोबत मिळून काम करत असला पण प्रत्यक्षात तो सुलतानचा द्वेष करायचा. त्याला आपला प्रतिस्पर्धी मानायचा. संधी साधून त्याला सुलतानला संपवायचे होते. तो त्याच तयारीत असायचा. एका चकमकीदरम्यान लखनने सुलतानाला आपली शिकार बनवल्याचे सांगितले जाते. मात्र आपणच सुलतानला ठार मारल्याचा दावा पोलिसांनी केला होता! सुलतानसोबत असलेल्या पुतलीबाईला माहित होतं की त्याला पोलिसांनी मारलं नसून लखननेच त्याला मारलं होतं. या संदर्भात पुतलीबाईने तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहिलं होतं अशा आशयाच्या बातम्या तेंव्हा प्रसृत झाल्या होत्या.  सुलतानच्या पश्चात टोळीत पुतलीबाई एकाकी पडली होती. याच टोळीतला एक सदस्य डाकू बाबू लोहार हा सुलतानच्या जागी सरदार (मुखिया) घोषित झाला. बाबू लोहारची नजर वाईट होती. त्याला देखण्या पुतलीचे वेध लागले होते. कसेही करुन हे पाखरु आपल्या कब्जात घ्यायचे हाच त्याचा ध्यास झाला होता. तो तिच्या भावनांशी खेळू लागला. पुतलीचे फक्त सुलतानवर प्रेम होते आणि त्याच्या मृत्यूनंतरही ती इतर कोणाचीही होऊ शकली नाही. पुतलीने बाबू लोहारचा सफाया करण्याचे ठरवले होते. एका पोलीस चकमकीदरम्यान संधीचा फायदा घेत पुतलीने आपल्याच टोळीचा म्होरक्या बाबू लोहारला यमसदनी पाठवलं! त्यानंतर पुतलीबाई तिच्या टोळीची प्रमुख झाली. टोळीतील निर्णय आता त्याच्या आदेशाने होऊ लागले. पोलीस सुद्धा तीस वर्षांच्या पुतलीबाईशी चार हात करायला हादरायचे. त्यांच्यातली रंजीश काही केल्या कमी होत नव्हती. सतत चकमकी घडत असत. अशाच एका चकमकीत पुतलीबाईला तिचा एक हात गमवावा लागला. तरीही तिच्या खुनशी सौंदर्याची दहशत वाढतच गेली. भिंड, मुरैना, शिवपुरी, ग्वाल्हेर भागात पुतलीबाईंचे नाव पन्नासच्या दशकात कर्णोपकर्णी झालं होतं. 1958 च्या जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत पोलिसांना खबर मिळाली की डकैत लखनसिंग कोठार गावात हल्ला करणार आहे. पोलिस तिथे पोहोचले. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला पण पोलिसांचा सामना लखनशी न होता पुतलीबाईशी झाला! चंबळची फर्स्ट लेडी डकैत तिच्या टोळीसह शस्त्रसज्ज पोलिसांशी भिडली! तिने प्रयत्नांची शर्त केली, प्राणाची बाजी लावली. त्यात तिला गोळी लागली. या चकमकीत पुतलीबाईसह तिचे नऊ साथीदार मारले गेले.वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी पुतलीबाईचा अंत झाला! इतक्या कोवळ्या वयात पुतलीबाईने चंबळच्या डोंगराळ रुक्ष प्रदेशात कधी आपल्या घुंगरांनी तर कधी बंदुकीच्या आवाजाने आपलं नाव अजरामर केलं! पुतलीच्या मृत्यूसमयी  तिची मुलगी तन्नो ही खूप लहान होती. पुतलीचा मृतदेह पुतलीची आई असगरबाई यांच्याकडे सोपवण्यात आला. चिमुरड्या तन्नोने आपल्या आईचे अंतिम संस्कार केले नि मग कुठे त्या थकल्या जीवाची तगमग थांबली! देखणं असणं, कलागुण अवगत असणं या गोष्टी स्त्रीसाठी बऱ्याचदा शाप ठरतात नि मग त्यांची फरफट सुरू होते जी मरेपर्यंत जारी असते, कारण समाज नावाचा चांडाळ मूकदर्शक होऊन तमाशा पाहत असतो! पूर्वप्रसिद्धी दैनिक पुण्यनगरी दि. 15/01/2023__________________________________  
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!