गुह्य आणि अमृतानुभव

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

ॐम नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय  स्वसंवेद्या। देवा तूचि गणेशु। सकलमूर्ती प्रकाशु। म्हणे निवृत्तीदासु। अवधारिजोजी॥ ही आणि त्या खालच्या १९ ओव्यात सगळी वेदोपनिषदे, अठरा पुराणे, श्रुती-स्मृती इत्यादी ग्रंथात आलेले सारे अध्यात्मशास्त्र गणेशाच्या रूपकात प्रगट केले आहे. सातशे श्लोकांच्या गीतेतल्या प्रत्येक अध्यायाच्या पुष्पिकेत योगशास्त्रेसु असा उल्लेख आहे. गीतेच्या मते ज्ञान, कर्म, योग, भक्ती हे सारे मार्ग हे परमेश्वराकडे नेणारे आहेत. ज्याला जो मार्ग पेलेले, सुलभ वाटेल त्या मार्गाने त्याने परमेश्वराला शरण जावे असा गीतेचा सारांश खुद्द श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला आहे. शेवटी जिकडे धर्म तिकडे जय असा महत्त्वपूर्ण उपदेश केला आहे. ज्ञानेश्वरांनी ७०० श्लोकांचा भावानुवाद करताना सुमारे सातसाडेसात हजार ओव्या लिहल्या आहेत. हे लिहून झाल्यावर ब्रह्मवस्तुच प्रत्यक्ष करतलावर दाखवल्यागत विवेचन करणारा अमृतानुभव हा स्वतंत्र ग्रंथ लिहला. सद्‍गुरू निवृत्तीनाथ ह्यांच्या आदेशानुसार त्यांनी तो मुद्दाम लिहला. असा आदेश ज्ञानेश्वरांना देण्यामागे  निवृत्तीनाथांचा हेतू एकच होता. तो म्हणजे गीतेच्या भावानुवाद करताना ज्ञानेश्वरांना मर्यादा पडल्या होत्या. ह्याउलट १० प्रकरणांचा  अमृतानुभव हा  ग्रंथ लिहताना ब्रह्मवस्तुच्या विवेचनातल्या सर्व मर्यादांवर त्यांनी मात केली.अमृतानुभवात शब्द कसा निरूपयोगी आहे ह्याचे विवेचन ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवात वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरीचा सहावा अध्यायदेखील ह्या दृष्टीने मुद्दाम वाचण्यासारखा आहे. अमृतानुभवात शब्दाविषयी खंडनमडनात्मक विवेचन केले आहे. ब्रह्मवस्तुची ओळख करून देण्यापुरतेच शब्दाचे काम असून ते झाले की शब्दाला काही काम शिल्लक राहात नाही. तो नाहीसा होतो! ह्या अर्थाने शब्दाचे काम फक्त आरसा दाखवण्यापुरते असून एकदा आरसा काढून घेतला की प्रतिबिंब पाहता येत नाही. ज्ञानेश्वरांनी लिहलेल्या अभंगातही हेच सत्य विषद करण्यात आले आहे. ह्याचाच अर्थ प्रत्यक्ष कृतीला महत्त्व असते, फाल्तु बडबडीला अजिबात महत्त्व नसते. फार मोठ्या व्यक्तीकडे काही मागायला लोक जातात तेव्हा त्या व्यक्ती त्याचे म्हणणे ऐकून त्याला हवे असलेले देऊन मोकळे होतात. त्यावर अजिबात चर्चा करत नाही. ह्याचा अनुभव राजकारणात, अर्थकारणात, व्यवहारात पदोपदी येत असतो. फार मोठे राजकारणी प्रतिक्रियेत अडकत बसत नाहीत. ‘सत्यं ब्रूयात्‌ मा ब्रूयातसत्यमप्रियमपि’ ह्या सनातन धर्माचा त्यांच्याकडून नकळतपणे अवलंब केला जातो! परंतु प्रत्यक्षात हा सनातन् धर्म आचरण्यास फार अवघड आहे.  नच आचरता येत असेल तर त्याचे म्हणून ऐकून घेतात आणि गप्प बसतात! मुळात आध्यात्मिक संवादात तर गप्प राहण्याला अत्यंत महत्त्व आहे. बडबड ऐकून अनेक जण मला दाखवा, प्रत्यक्ष सिध्द करून दाखवा वगैरे गोष्टी बोलत राहातात. वास्तविक ब्रह्मवस्तु प्रत्यक्ष दाखवण्याचा पराक्रम मोठमोठ्या गुरूंनाही जमला असेल की नाही ह्याबद्दल मला शंका आहे. अशावेळी त्याला शिष्यभावाने आपल्या जवळ ठेवून घेतात. त्याला समजले तर समजले, अन्यथा ह्या जन्मी किंवा पुढल्या जन्मी समजेल असे थातूरमातूर उत्तर देऊन त्याला निरोप देतात. वास्तविक खरोखर ज्याला ब्रहम्हज्ञान प्राप्त झालेले असते तो ते गावभर सांगत बसत नाही. त्याच्या चेह-यावरची प्रसन्नताच सगळे काही सांगून जाते. त्याच्यापुरते तरी ‘ब्रम्हिचे स्वराज्य’ आलेले असते. गीतेत म्हटल्याप्रमाणे प्रयाणकाळी म्हणजे ह्या जगाचा निरोप घेतेवेळी तो स्थिरचित्त असतो. अशी स्थिरचित्त माणसे मी माझ्या कुटुंबात पाहिली आहे.  आजोबांच्या आणि वडिलांच्या मृत्यूप्रसंगी मी हजर होतो. त्या वेळी स्थिरचित्ताचा खरा अर्थ मला कळला. त्यांच्या शेवटच्या आजाराला निमित्तकारण मात्र अवश्य घडले होते. असो त्यावर अधिक भाष्य  करणे मला उचित वाटत नाही. पुनरपि जननं पुनरपि मरणं हेच खरे आहे! रमेश झवर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!