खेळ आगळा नशिबाचा - आत्मकथन भाग ६

By jyubedatamboli on from https://jyubedatamboli.blogspot.com

खेळ आगळा नशिबाचा - आत्मकथन भाग ६✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळीदैव जाणिले कुणी होऽऽ दैव जाणिले कुणी |लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मिकी मुनी ।      या गाण्याच्या ओळींची प्रचिती आपल्या जीवनात वारंवार येते. यश हे प्रयत्नानेच मिळते हे ९९% बरोबर आहे; पण एक टक्का नशिबाचा असतो आणि तो इतका प्रबळ असतो की, तो या ९९% चेही कांहीच चालू देत नाही. आता आमचेच पहा ना! माझा भैय्या १९७४ साली डी. एड्. झाला. १९७२ च्या दुष्काळात शिक्षक भरती अधिक झाल्याने पुन्हा भरती झाली नसल्याने त्याला नोकरी लागली नव्हती. आर्थिक टंचाईमुळे त्याला दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करावी लागत होती. एका हायब्रिड ज्वारीच्या पोत्यासाठी महिनाभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत चिमण्यांना हाकलून ज्वारीची राखण करण्याचे काम तो करत होता. प्रसंगी ऊस तोडणी कामगाराचे कामही तो करत होता. कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी वाट्टेल ते कष्ट आम्ही भावंडे करत होतो.        १९७६ साली मी डी. एड्. झाले. माझे आदरणीय काका शिक्षक पदावर नांद्रे जि. सांगली येथे कार्यरत होते. ते भैय्याला नोकरी लागावी यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या मित्राचे बंधूराज जयसिंगपूर शिक्षण मंडळाकडे प्रशासन अधिकारी होते. काकांनी आमच्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल सांगून भैय्याला नोकरी लावण्याची त्यांच्याकडे विनंती केली. त्यांनी कोल्हापूर एम्प्लायमेंट ऑफिसकडे नांव नोंदविण्यास सांगितले व जयसिंगपूरचा पत्ता देण्यास सांगितले. काकांनी तसा निरोप आम्हाला दिला. आता जातोच आहेस तर ज्युबेदालाही बरोबर ने नाव नोंदवायला असे सांगितले, पण तिच्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत असे  ठरले. चांगले स्थळ बघून लग्न करू असा त्यांनी विचार केला.       कोल्हापूरला नांव नोंदविण्यास जाण्यासाठी प्रवास खर्चाची तरतूद आमच्याकडे नसल्याने चार दिवस दोघांनी शेतमजुरी केली. एका दिवसाची मजुरी होती फक्त २ रूपये. ४ रूपये उचल घेऊन २० रूपये जमले. त्यात येण्याजाण्याचा खर्च भागतोय का याची खात्री केली. त्यावेळी आमच्या गावाहून कोल्हापूरला जायला एस. टी. नव्हती. खोचीहून कोल्हापूरला डायरेक्ट कमी खर्चात जाता येत असल्यामुळे सकाळी ७ वाजता फडक्यात भाकरी बांधून चालत खोचीपर्यंत आलो. माळवाडी ते खोची अंतर १० कि. मी. आहे. कोल्हापूरात साधारणपणे ११ वाजता पोहोचलो. यापूर्वी आम्ही कोल्हापूरला गेलेलो नव्हतो. सोबत एम्प्लायमेंट ऑफिसचा पत्ता होता. त्यावेळी आजच्यासारख्या रिक्षा उपलब्ध नव्हत्या, आणि असल्यातरी आम्हाला ते परवडणारे नव्हते. एस. टी. भाड्यापुरते पैसे आमच्याकडे होते. विचारत विचारत पुढे चालत राहिलो. प्रत्येकजण म्हणत होता या रस्त्याने पुढे जा, डावीकडे वळा, डावीकडे वळून गेल्यावर पुढे जाऊन उजवीकडे वळण्याचा सल्ला मिळत होता कारण कांही वेळा पुढे जाऊन आम्ही वळत होतो तर कधी अलिकडच्या रस्त्याने वळत होतो. चालून चालून थकलो होतो पण इलाज नव्हता. नांव नोंदवून भैय्याला नोकरी मिळवायची होती ना! शेवटी २ वाजता ऑफिस सापडले. जीवात जीव आला पण पाहतोय तर काय! ऑफिसमध्ये गर्दी फुल्ल होती. जेन्टस् विभागाकडे नांव नोंदणीसाठी भली मोठी रांग होती. लेडिज विभागाकडे त्यामानाने गर्दी कमी होती. भैय्याने माझी कागदपत्रे काढून दिली व मी लेडीज विभागाकडे नांव नोंदणीसाठी गेले. चार वाजता माझा नंबर आला. नांव नोंदणी झाली. भैय्याचा नंबर अजून आला नव्हता. तो एवढंस तोंड करून रांगेत उभा होता. माझीही अवस्था त्याच्यापेक्षा वेगळी नव्हती. भैय्याची नोंदणी झाल्यावर पदरातली भाकरी आम्ही खाणार होतो. दहा बारा उमेदवारानंतर भैय्याचा नंबर होता. तोपर्यंत पाच वाजले, नोंदणी थांबली. आम्ही खूप चिंतेत पडलो. आता काय करायचे? मुक्काम करावा तर जवळचे कोणीही नातेवाईक नव्हते. जवळची रक्कमही जेमतेम होती. अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो. कळकळीची विनंती केली. नोंदणी करण्यास नकार दिला त्यांनी पण एक मार्ग सांगितला. गांवी गेल्यानंतर तुमच्या सर्टिफिकेटस् व मार्कलिस्टच्या मूळप्रती व खऱ्या नक्कल पोष्टाने पाठवा. सोबत तुमचा पत्ता लिहिलेला एक लिफाफा पोष्टेजसह पाठवा. आम्ही नोंदणी करून तुमच्या मूळ प्रती व नोंदणी कार्ड पाठवून देतो. चार-पाच दिवसात तुमची नोंद होईल. "साहेब, नक्की नोंद होईल ना चार-पाच दिवसात?" असे विचारल्यावर ते ... म्हणाले, 'बिनधास्त जा, तुमच काम होईल', त्यांच्या बोलण्यावर आमचा विश्वास बसला. बसणं भागच होतं. कारण दुसरा उपायही नव्हता आमच्याकडे.        संध्याकाळी सहा वाजता स्टॅण्डच्या बाकड्यावर बसून आणलेली भाकरी खाल्ली. पोटभर पाणी पिऊन खोचीला, जाणाऱ्या एस. टी. त बसलो. खोचीत आलो त्यावेळी रात्रीचें साडेआठ वाजले असावेत. काळोखी रात्र होती. लाईटची आजच्याइतकी सोय नव्हती. हातात बॅटरी नव्हती. एकमेकाच्या आधाराने चालत चालत रात्री दहा वाजता घरी परतलो. घरची मंडळी काळजी करत वाट पहात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मजूरी करून दुपारी भैय्याने दुधगांवला पोष्टात जाऊन अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्तता केली व नोंदणी होऊन परत येणाऱ्या लिफाफ्याची वाट पहात बसलो.               दरम्यान काकांनी ओळखीच्या व्यक्तिकडून जयसिंगपूर शिक्षणमंडळाकडे नांव पाठविण्यासाठी व्यवस्था केली होती. साहेबांनी यादीत तांबोळी नांव आल्याचेही काकांना सांगितले. पण ते नांव भैय्याचे नव्हते माझे होते. पोष्टाद्वारे भैय्याच्या नावाची नोंदणी होण्यापूर्वीच इकडे यादी आली होती. माझे नांव चुकून आले, सर्वांनीच कपाळाला हात लावला. मी माझ्या कुटूंबियाना एवढेच सांगितले की, भैय्याला नोकरी लागेपर्यंत भैय्या बनून कुटूंबाची जबाबादारी घेईन, लग्नाचा विचारही करणार नाही. आणि घडलेही तसेच पुढे २ वर्षांनी त्याला रयत शिक्षण संस्थेत नोकरी लागली. ३२ वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर भैय्या निवृत्त झाला. केवळ दैवयोगानेच जयसिंगपूर शिक्षण मंडळात ३८ वर्षे ४ महिने विद्यादान करण्याची संधी मला मिळाली. खेळ आगळा नशिबाचा! दुसरं काय?
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!