खरी मैत्री - मराठी कथा

By jyubedatamboli on from https://jyubedatamboli.blogspot.com

खरी मैत्री - कथा✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी                         फोटो साभार: गूगल       जया व उषा अगदी पहिली पासूनच्या मैत्रिणी. दोघींची घरे एकमेकींच्या जवळ नव्हती पण दोघींची मने फारच जवळ होती. दोघींनाही एकमेकीशिवाय अजिबात करमायचे नाही. एकीने कांही अपरिहार्य कारणास्तव शाळा चुकवायचं ठरवलं की, दुसरीही त्या दिवशी शाळा चुकवायची. त्या दोघींना मैत्रिणींनी जोडगोळी हे टोपणनांव ठेवले होते. हायस्कूलमध्ये या दोघींसाठी रेकॉर्ड फिश पाँड़ ठरलेला होता' यें दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे'.       उषाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. शिवाय ही पाच भावंडं. उषाला दोन भाऊ व दोन बहिणी होत्या. तिचे वडील शेतकरी होते. याउलट जयाची परिस्थिती होती. जयाचे वडील शिक्षक होते. त्यांचे कुटुंबही छोटे होते. जयाला एक भाऊ होता. तिचे वडील अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यायचे. जया उषाला अभ्यासात मदत करायची.       दोघींनी अकरावीची म्हणजेच मॅट्रिकची परीक्षा दिली. दोघीनी एकत्रच कॉलेजला जायचे ठरविले. पण दैवाचे फासे कसे पडतील सांगता येत नाही. उषाला एक स्थळ चालून आलं. मुलाला चार-पाच एकर बागायत शेती होती. तो एकुलता एक होता. उषाच्या वडिलांनी विचार केला आपल्याला तीन मुली आहेत पाठोपाठ. त्यामुळे असं सोन्यासारखं चालून आलेले स्थळ नाकारण बरं नाही. एका मुलीच्या कर्तव्यातून मुक्त होण्याची नामी संधी आहे. ती कशाला सोडून द्यायची? त्यांनी उषाचं लग्न करून टाकलं, उषा चारचौघीसारखी संसारात रमून गेली. पतीला मदत करू लागली.       इकडे जया बी. कॉम् झाली. बँकेत नोकरी करणाऱ्या उत्तमरावांशी ती विवाहबद्ध झाली. उत्तमरावांची नोकरी नॅशनल बँकेत असल्याने तिला बदली होईल तिकडे स्थायिक होणे भाग पडले. सुरुवातीच्या काळात सणावाराच्या, यात्रेच्या निमित्ताने माहेरी आल्यावर दोघींची भेट व्हायची. छान गप्पा रंगायच्या, सुखदुःखाची बोलणी व्हायची. कालांतराने दोघींचेही माहेरी येणे जाणे कमी झाले. दोघीही आपापल्या संसारात रंगून गेल्या. त्यामुळे मैत्रीत कांही काळ अंतर पडले. उषाला दोन मुले. दोघेही ग्रॅज्युएट झाले. एक मुलगा गावातील पतसंस्थेत नोकरी करु लागला. दुसरा मुलगा बी एस्.सी. ॲग्री झाला. त्याला शेतीची आवड असल्याने स्वखुषीने तो वडिलांना शेतीत मदत करू लागला. शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न दुपटीने घेवू लागला. दोन्ही सुना सुस्वभावी मिळाल्या. उषाचा संसार दृष्ट लागण्या सारखा झाला.       जयाला एक मुलगा व एक मुलगी. दोघेही खूप हुशार होते. मुलगा इंजिनिअर झाला. कंपनीत भरपूर पगाराची नोकरी लागली. कंपनी तर्फे अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली, थोड्या कालावधीसाठी गेलेला तो तिथेच रमला. आईवडिलांना न कळवता तिथल्याच मुलीशी विवाहबध्द झाला. त्यांची लेकही इंजिनिअर झाली. जया उत्तमरावांनी तिचा विवाह करून दिला. जावई अमेरिकेत जॉब करत असल्याने तीही पतीबरोबर अमेरिकेला निघून गेली. तिथेच नोकरी करू लागली. अशाप्रकारे दोन पिलं घरट्याबाहेर निघून गेली.       योगायोगाने उत्तमरावांची बदली उषाच्या गावात झाली. भाजी मंडईत दोघी अचानकपणे एकमेकींसमोर आल्या, आणि त्यांची बालपणीची मैत्री बहरून आली. दोघी वेळात वेळ काढून एकमेकींकडे जायच्या. उषाच्या कुटुंबातील छोट्या मोठ्या कार्यक्रमात जया व उत्तमराव सहभागी होऊ लागले. सुट्टीच्या दिवशी शेतात सहभोजन होऊ लागले. घरोबा इतका वाढला की उषाची मुलं-सुना-नातवंडं यांना ही दोघं घरचीच वाटू लागली. या दोघांनाही आपली मुलं आपल्याजवळ नाहीत याचा विसर पडला. दिवस सुखासमाधानात चालले होते.       दैव जाणिले कुणी? म्हणतात ते अगदी खरे आहे. एके दिवशी बँकेतून परत येत असताना उत्तमरावांच्या स्कूटरला एका ट्रकने ठोकरले, त्यातच त्यांचा अंत झाला. उषाच्या संपूर्ण कुटूंबाने जयाला मानसिक आधार दिला. तिच्या सासर माहेरच्या नातेवाईकांना बोलावून त्यांनीच अंत्यविधी पार पाडला. निवृत्ती जवळ आल्याने उत्तमरावांनी त्याच गावात एक बंगला घेतला होता. पण त्या बंगल्यात जया घायाळ पक्षिणीप्रमाणे राहू  लागली. वडिलांच्या अंत्यविधीला डिलेव्हरी झाल्याने मुलगी येऊ शकली नाही. मुलगा पाच दिवसानंतर आला. आईला अमेरिकेला येणार का असं विचारून तिनं कशाला म्हटल्याबरोबर आपलं कर्तव्य संपल असं समजून निघून गेला. पती निधनानंतर जया मनानं खूप खचली. उषासमोर आनंदी असल्याचं नाटक करायची पण एकांतात खूप रडायची. रात्र तिला खायला उठायची. या प्रचंड मानसिक तणावामुळे व्हायचे तेच झाले. एके दिवशी झोपेतच तिला पॅरालेसिसचा अटॅक आला. शेजाऱ्यांनी उषाला फोन केला. उषाचे कुटुंब धावून आले. तिला दवाखान्यात नेले. उपचार सुरु केले. तिच्या मुलांना फोन केला. पण रजा नसल्याचे सांगून दोघेही आले नाहीत. उत्तमराव एकुलते एक असल्याने सासरचे कोणीच इकडे येऊन तिची सेवा करण्यासारखे नव्हते. जयाचा भाऊही मुंबईत नोकरीला होता. भावजयही नोकरी करणारी त्यामुळे तो दवाखान्यात आला व पाहुण्यासारखा बघून निघून गेला. जयाच्या तब्येतीत किंचीत सुधारणा होऊ लागली.       पण ती बोलू शकत नव्हती. तिला उठवून बसवावे   लागायचे. भिंतीला तक्क्या लावून त्याच्या आधाराने थोडा वेळ बसू लागली. तिला घास भरवावा लागायचा, तिचे केस विंचरावे लागायचे. कपडे बदलावे लागायचे. उषा पाठच्या बहिणी प्रमाणे अगदी मनापासून तिची सेवा करत होती. जयाला बोलता येत नव्हते पण सर्व काही समजत होते. तिचे डोळे खूप बोलके होते. ती डोळ्यानेच उषाचे आभार मानायची. आपल्या हलणाऱ्या एका हाताने तिच्या तोंडावरून हात फिरवायची.       तब्बल पंधरा दिवसांनी मुलाला रजा मिळाली तो हॉस्पिटलमध्ये आला. त्याला पाहून जयाच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. आईची ही अवस्था बघून पुढं काय करायचं या विचाराने तो पुरता गोंधळून गेला. उषानं त्याला सांगितलं की चार-पाच दिवसांनी तिला डिसचार्ज मिळणार आहे. जयाचे चिरंजीव तिचा हात हातात घेऊन उषाला म्हणाले, "उषाअंटी आईला अशा अवस्थेत अमेरिकेला नेणे शक्य नाही. मी तिची शहरातील कुठल्यातरी चांगल्या वृद्धाश्रमात ठेवण्याची व्यवस्था करून जातो. अधेमधे तुम्ही तिकडे जाऊन लक्ष द्या. मी ही फोनवर चौकशी करत जाईन "उषा म्हणाली, " जयाची ही मैत्रिण जिवंत असतांना तिला बेवारसाप्रमाणे वृध्दाश्रमात जाऊ देणार नाही " चिरंजीव आनंदाने म्हणाले, "हे ठिक होईल आंटी! मी दरमहा सांभाळण्याचे पैसे पाठवत जाईन. तुमचा खातेनंबर द्या. महिन्याला खात्यावर पैसे जमा होतील" उषा म्हणाली, "तुझ्याकडून पैसे घेऊन माझ्या जिवाभावाच्या बालमैत्रिणीची सेवा करायला आम्हाला कांही भीक नाही लागली. देवानं खूप दिलंय आम्हाला. पती, मुलं, सुना, नातवंडांनी घर भरलंय माझं त्यात माझी मैत्रिण मला जड नाही. सगळी मदत करतात मला. सुना तिला खाऊ घालतात. मुलं बाहुलीप्रमाणे उचलून आंघोळीला नेतात आणतात. तू निर्धास्तपणे जा. मी बघते माझ्या मैत्रिणीचं!"       उषाने जयाची कुटुंबियांच्या मदतीने मनोभावे सेवा केली. तिला फुलाप्रमाणे जपलं. स्वच्छ ठेवलं. जया हे सर्व डोळे भरून पहायची. खाणाखुणा करून देव तुमचं भलं करो अशी प्रार्थना करायची. आणि मैत्रिण असावी तर तुझ्यासारखी असं इशाऱ्यानं बोलायची. अशा अवस्थेत दोन वर्षे कशी निघून गेली ते कळलेच नाही. एके दिवशी झोपेतच जयाने जगाचा निरोप घातला. उषाला थँक्यू म्हणून ती निघून गेली!
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!