काय चुकते नक्की ?

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

गेले २-३ दिवस आभाळ गच्चं भरून यायचं आणि प्रत्येकाला वाटायचं आता आपला पाऊस येणार. पण दोन-चार थेंबांसोबत एक-दोन सरी बरसायच्या आणि मग पुन्हा सर्व शांत-शांत , उदास-उदास. कंटाळा येऊ लागला होता आता तर त्यात भरीस भर म्हणून लख्ख पडणारं ऊन आणि तेही भयंकर उकाडा आणणारं. तर असा हा खेळ उगाच आकाशात दिवसातून दहादा तरी खेळला जाई. तशी काही दिवसांपूर्वी पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. पण तो आपला पाऊस नव्हता. आता 'आपला' म्हणजे नेहमीसारखा जुन महिन्यातील ७ तारखेलाच थंड झुळूकेसोबत हळूच डोकावत हळूहळू वाढत जाणारा पहिला पाऊस... तो खरा आपला पाऊस. नाहीतर हा 'वायू'सोबत आलेला पाऊस! अचानक जोरदार वारे वाहू लागले आणि दुसऱ्याच क्षणी मुसळधार पाऊसच पाऊस ! तो देखील भयंकर ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासोबत.  ना मातीचा तो पहिला सुगंध अनुभवायला मिळाला ना अंगावर अलवार आलेली पहिली सर. एक पाऊल बाहेर टाकले आणि एका क्षणात चिंब अंघोळ. १-२ तास चालणारा खेळ अवघ्या १५ मिनिटांत समाप्त. असे असले तरी त्या पावसाची देखील मनसोक्त मजा लुटली आम्ही. पण एकदा मनात वाटले. बापरे ! पहिला पाऊस हा एवढा मोठ्ठा तर आता पुढे काय ? पाण्याने भरलेले रस्ते , बंद पडलेल्या लोकल्स एका क्षणात डोळ्यासमोर उभ्या राहिल्या होत्या. पण कसले काय अन कसले काय ? दुसरा दिवस उजाडला तो लख्ख प्रकाशात. आकाशात सूर्य चांगलाच झळाळत होता आणि दिवसेंदिवस उकाडा वाढत होता. पण काल तो आला आणि चांगला रात्रभर बरसला.अगदी बालपणीचा पाऊस आठवून गेला. सकाळी उठले तर वातावरणात चांगलाच गारवा होता. ढगांची शाळा नुकतीच भरू लागली होती. सृष्टी कशी एकदम न्हाऊन गेली होती . निसर्गाचे हे असे रूप पाहायला मला नेहमीच आवडते. म्हणून अगदी उत्साहात ऑफिसच्या तयारीला लागले. नावासाठी पावसाची किंचित रिमझिम सुरु होती. अशी रिमझिम छत्रीशिवाय झेलायला मला नेहमीच आवडते. स्टेशनवर नेहमीचेच दृश्य पण तरी पावसाच्या आगमनामुळे सारेच थोडे वेगळे भासणारे. ट्रेन वेळेवर आहेत हे पाहून जरा बरे वाटले.तो एक खूप मोठा दिलासा असतो. थोडी गर्दी होती पण बऱ्यापैकी दरवाज्यापाशी उभे राहण्याची संधी मिळाली. मला आज हेच हवे होते. धावत्या गाडीसोबत पळणारी झाडे , इमारती पाहायला एक वेगळीच मज्जा असते. हवेतला गार वारा झेलत माझी नजर त्या नुकत्याच न्हाऊन निघालेल्या सृष्टीचे नवतारूण्य पिऊन घेत होती. हिरवीगार झाडे पाण्याने धुवून निघून गेल्याने आणखी तरुण भासत होती. एका दिवसात काही लगेच इतकी हिरवळ जन्माला आली नव्हती पण आहे ती अशी धुवून निघाली आणि लक्ष वेधले गेले इतकेच. भरलेल्या आभाळात अशा हिरवळीसोबत धावणारे आगगाडीचे रूळ ... एक सुंदर निसर्गचित्र. पण आज या चित्राने मी नाराज झाले . त्या रुळांमधल्या जागेत गाडीच्या वेगासोबत धावताना दिसत असणाऱ्या खडीच्या राशी पार कचऱ्याने झाकल्या गेलेल्या आणि त्यामुळे रुळांचे ते सौन्दर्य कुठेतरी पुसल्यासारखे वाटले. रिकामे चहाचे कप , चुरगळलेले कागद , प्लॅस्टिकच्या पिशव्या वरून या सर्वांमुळे तुंबलेले पाणी... या सर्वामुळे तो परिसर गलिच्छ वाटू लागतो. पुढे जसजसे स्टेशन जवळ येऊ लागले हा कचरा कमी झाल्यासारखा जाणवला स्टेशनवरच्या रुळांवर बऱ्यापैकी स्वच्छता पण स्टेशन मागे पडले आणि पुन्हा त्या अस्वच्छतेचे प्रमाण वाढत गेले. पुढचे स्टेशन आले आणि गेले. पुन्हा तेच. असे का असेल याचा विचार न राहवून मनात येत राहिला आणि उत्तरेही मीच माझी शोधू लागले. स्टेशन्सवर साफसफाई करणारे कर्मचारी अधिक असतात म्हणून ? स्टेशनवर कचरापेट्या अधिक असतात आणि मधल्या प्रवासात त्यांची कमी निर्माण होते म्हणून ? कि मग माणसांची मानसिकताच कुठेतरी चुकत असते ?असे एक ना अनेक प्रश्न मनात उदभवलेले असताना मी माझ्या ठरलेल्या स्टेशनवर उतरून बाहेर निघाले. पुढचा रिक्षाचा प्रवास सुरु झाला. डावीकडे मेट्रोच्या कामामुळे बंद झालेला अर्धा रस्ता आणि उजवीकडे रोजचाच पदपथ पण आज तिथल्या गोष्टी मनाला खटकू लागल्या. जागोजागी असलेले खड्डे आणि अधेमध्ये असलेले फेरीवाले... ते सर्व मुळी आपल्या हातात नव्हेच परंतू तिथे जमा होणारा कचरा मात्र आपल्यापैकीच अनेकांमुळे होत असेल ना ? चॉकलेटचे कव्हर , चुगळलेली कागदे ,प्लॅस्टिकच्या पिशव्या पावसामुळे अधिक घट्ट होऊन बसतात. अशाच नको त्या कचऱ्यामुळे रस्त्यावरून गटारांमध्ये वाहणारे पाणी अडले जाते आणि मग रस्त्यावर काही तासांत पाण्याचा पूर येतो.पाणी वरून सतत येत राहते परंतू ते जाण्यासाठीच्या वाटा बंद झालेल्या असतात आणि मग काय ? सगळीकडे नुसते पाणी पाणी. आणि मग हाच हवाहवासा वाटणारा पाऊस तासाभरात नकोसा होऊन जातो . हे सर्व विचार मनात चालू असतानाच शेजारीच बसलेल्या मुलीने तिच्या पर्स मध्ये नको असलेली फाटलेली पिशवी एकदा तपासून जाणून बाहेरच्या दिशेला भिरकावली. ती पिशवी भिरभिर करत उडत जाऊन अशाच एका आडोश्याला थांबलेल्या कचऱ्यात जाऊन बसली.टापटीप एकदम चांगली मुलगी वाटत होती ती तर . पण तरी असे वर्तन ? मी एक तीक्ष्ण नजर तिच्यावर टाकली .मी काही बोलण्याच्या आत ती स्वतःच उत्तरली ," चुकून झाले". पण चुकून तरी अशी चूक का व्हावी ना ? हा माझा प्रश्न होता. पण त्या तिथे वाद घालण्यात अर्थ नव्हता  हे अगदी १-२ मिनिटांच्या संवादातून मला कळून चुकले. त्यावेळी तिच्या मानसिकतेबद्दल किंव आली.पण अशा लोकांच्या बाबतीत काही करू शकत नाही हे मात्र खरं.तिला नको असतानाही तिला उपदेशाचा एक डोस मी पाजला होता पण त्याचा किती उपयोग होईल हे तिलाच ठाऊक. मनात आले , आपण झाडांची नको इतकी कत्तल करत असतानाही निसर्ग आपल्याला आभाळभर पाऊस देतच असतो. तो इतके काही करतो, देतो आणि आपण साधे त्याला योग्य वाटही मोकळी करू शकत नाहीत. समोरच्या पदपथावर गालिच्यासारखी फुले बरसली होती, ती तशीच भिजत राहिली होती. त्यावर एक रिकामा चहाचा पाण्यावर तरंगू लागला होता. ही अशी असंख्य दृश्ये आणि ती निर्माण करणारी माणसे यांची सोबत करत मी ऑफिसच्या गेटपाशी थांबले. ती मुलगी जवळच्याच वडापावच्या गाडीवर जाऊन ऑर्डर देऊ लागली. वडापावसोबत मिळालेल्या कागदाला पाहून मनात म्हटले कि हा कागद तरी आत योग्य ठिकाणी जावा म्हणजे केलेल्या उपदेशाचा फायदा होईल. मीही गोदरेज आय टी च्या गेटमध्ये शिरले. तिथली हिरवळ पूर्ण अर्थाने नटली होती. फुलपाखरे स्वच्छंद भिरभिरत होती. रस्त्यावर , रस्त्याच्या कडेला कुठेच इतकासा कचरा सुद्धा नजरेस पडला नाही. असे का असेल याचा विचार न राहवून पुन्हा एकदा  मनात आला आणि  त्याची उत्तरेही माझी मीच पुन्हा शोधू लागले. इथे साफसफाई करणारे कर्मचारी अधिक असतात म्हणून ? रस्त्यावर कचरापेट्या अधिक असतात आणि मधल्या प्रवासात त्यांची कमी निर्माण होते म्हणून ? कि मग माणसांची मानसिकताच कुठेतरी चुकत असते ? - रुपाली ठोंबरे. 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 4
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!