आकाशवाणी

By Mohana on from mohanaprabhudesai.blogspot.com

काही वर्षापूर्वी, रत्नागिरीला गेले तेव्हा आवर्जून आकाशवाणीत गेले. सगळ्यांची भेट होईल, जिथे काम केलं ती जागा  पुन्हा पहावी, ’ऑन एअर’ चा लाल दिवा डोळ्यात साठवावा, गप्पा झाडायचो त्या भोजनालयात जाऊन पुन्हा हसावं खिदळावं असं काही बाही मनात होतं. पण अवकळा पसरलेलं ते केंद्र विषादाचा चरा उमटवून गेलं मनावर. मी काम करत असतानाची सगळी जणं कामाच्या वेळा वेगळ्या असल्याने ठरवूनही तिथे एकत्र भेटणं कठीणच होतं.  जिथे हक्काने ’आवाज’ फुटायचा तिथे मनातल्या भावना शब्दाने व्यक्त कराव्याशा वाटल्याच नाहीत.  सरकारी आकाशवाणी केंद्रांची अवस्था आता कशी आहे याची कल्पना नाही, पण सात आठ वर्षापूर्वी फार बिकट होती.परतीच्या मार्गावर ’आकाशवाणी’ मनात पिंगा घालत राहिलं. पार शाळेच्या उंबरठ्यापाशी घेऊन गेलं.रात्री साडेनऊला लागणारं कॉफीहाऊस, प्रपंच मालिका, सकाळी सात, दुपारी दिड, संध्याकाळी सात आणि रात्री आठ वाजता लागणार्‍या प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातम्या.कॉफी हाऊसमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम आणि भाग्यश्री जोशी. हसत खेळत युवावर्गांच्या गप्पागोष्टी असायच्या ह्या. प्रपंच मध्ये प्रभाकर पंत, मीना वहिनी आणि टेकाडे भावजी. त्यातल्या मीना वहिनी म्हणजे नीलम प्रभु (करुणा देव), आवाज आणि उच्चारांचा त्यांच्या इतका प्रभावी वापर केलेलं कुणी पाहिलं नाही मी अद्यापपर्यंत.  त्यांनी केलेल्या  एका श्रुतिकेतील मुलगी, मध्यमवयीन आणि वृद्ध स्त्रीचे आवाज ऐकून मला कितीतरी दिवस दुसरी नीलम प्रभु व्हायचं होतं :-).जुन्या आठवणींबरोबर आकाशवाणीत काम करत असतानाचेही दिवस पिंगा घालत राहिले. ज्या जगाचं आकर्षण होतं त्या जगात डोकावयला मिळालं. काम करायला मिळालं. सुरुवातीला आकर्षण होतं ते आकाशवाणीची गाडी पहाटेच्या कामाच्या वेळेला न्यायला घरी येते त्याचं. कुण्णीतरी अगदी मोठ्ठं झाल्यासारखं वाटायचं गाडीत बसताना. आकाशवाणीत पोचलं की कार्यक्रम काय काय आहेत ते पहायचे, पटापट निवेदन लिहायचं आणि कार्येक्रमाचं सारं सामान घेऊन स्टुडिओत. खाक खुक करुन आवाज नीट आहे ना हे पाहिलं की पहिल्या कार्यक्रमाची तबकडी घालून ठेवायची. आणि मग ’ऑन एअर’ चा लाल दिवा कधी लागतोय त्याकडे नजर ठेवून बसायचं. एकदा का तो दिवा लागला की आपले आपण, म्हणजे  काही गोंधळ होईपर्यंत. तसा तो व्हायचाही अनेकदा. आवाजात चढ उतार आणत सगळं काही बोलून झालं की अचानक गडबडीने तंत्रज्ञ आत घुसायचे. बटनं चुकीची दाबल्यामुळे किंवा न दाबताच बोलल्याने श्रोत्यांनी काहीही ऐकलेलं नसायचं. मग, माफ कराही अशा झोकात यायचं की काही तरी फार मोठं श्रोत्यांना सांगतोय असा आव यायचा त्यात.निवेदकांमध्ये आपापसात स्पर्धा असायची ती सूर मनी रंगती आणि आपली निवड हा संगीताचा कार्यक्रम सादर करताना. अस्सं काही निवेदन असायचं ना प्रत्येकाचं. एकतर श्रोत्यांकडून वाहवा मिळावी हा हेतू आणि कार्येक्रम अधिकार्‍यांकडून मिळणारी श्रेणीही महत्तवाची.एक आठवण कायमची मनात रुतली आहे. गाणं होतं, ती गेली तेव्हा.... दोन ओळी ऐकून पूर्ण गाणं काय आहे याचा अंदाज घ्यायचा आणि निवेदन लिहायचं. ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता.... या गाण्याला माझं निवेदन होतं ते प्रेयसी प्रियकराला भेटून निघाली आहे अशा अर्थीचं. वयाच्या २१, २२ वीशीचा हा परिणाम. निवेदन संपलं, गाणं सुरु झालं. आणि हातापायातलं त्राणंच गेलं. ती आई होती म्हणूनी.... ऐकलं आणि काय गोंधळ केला आहे ते लक्षात आलं. कहर म्हणजे, एकाच गाण्याकडे निवेदक किती वेगळ्या दृष्टीने बघू शकतो याचं श्रोत्यांना कौतुक वाटलं होतं.आकाशवाणी रत्नागिरीहून मुंबईला गेले. कामावर हजर होण्यापूर्वी साहेबांची भेट घ्यावी म्हणून त्यांच्या खोलीत गेले. टेबलाची रचना विचित्र होती की माझा गोंधळ उडाला होता कुणास ठाऊक. खोलीत कुणीच नव्हतं. मी एका खुर्चीवर बसले. थोड्यावेळाने साहेब आले. मी उठून उभी राहिले आणि हात जोडून नमस्कार केला. पुन्हा बसले. ते आपले उभेच. काहीतरी चुकतय असं वाटत होतं पण काय ते कळत नव्हतं. काही वेळ असं बोलणं झालं आणि मी म्हटलं,"सर, तुम्ही बसा ना." ते म्हणाले,"तुम्ही माझ्या खुर्चीवर बसला आहात.""ऑ?" विजेचा धक्का बसल्यासारखी उठले. मुंबई आकाशवाणीची सलामीची भेट झडली ती अशी.एकदा कोणतातरी कार्येक्रम ध्वनिमुद्रित केला होता. चुकून त्यावर आणखी एक कार्यक्रम टेप केला. मग पुन्हा त्या कलाकारांना बोलवून ध्वनिमुद्रण, मुंबईसारख्या ठीकाणी पुन्हा सर्वांना एकत्र आणण्यासाठी केलेली शाब्दीक कसरत अजूनही आठवते.एक ना अनेक प्रसंग काही हसवणारे, महान कलाकारांची भेट झाल्याचा आनंद मिळवून देणारे, काही हातपाय गाळणारे तरीही सगळे मंतरलेले...(इंद्रधनु - तुझ्या पोस्टमुळे या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद.)
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 4
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!