आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त!

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

योगदिनानिमित्त योगपरंपरेचा विचार केल्यास हटयोगप्रदिपिका. धेरंडा संहिता,  पतंजली योगसूत्रे इत्यादि अनेक संस्कृत ग्रंथांची नावे डोळ्यांसमोर येतात. योगाचे स्वरूपतः तीन प्रकार रूढ आहेत. पहिला मार्ग यमनियम, आसन प्राणायामादिद्वारा कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी आसन, मुद्रा आणि प्राणायामाचा मार्ग . त्याला ‘साधन-सिध्द’ मार्ग म्हटले जाते. दुसरा  मार्ग सद्गुरुच्या कृपेने ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते. त्याला आसन वगैरे करावी लागत नाहीत. ती आपोआप होतात. ह्या मार्गाला ‘कृपासिध्द मार्ग’ म्हटले जाते. तिसरा मार्ग जन्मजन्मान्तराच्या पुण्यासंचयाने ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते त्याला दैवसिध्द साधक संबोधले जाते. त्याला आसनप्राणायादि उपाय सहज जमताता. हे तिन्ही मार्ग आपापल्या परीने श्रेष्ट मार्ग आहेत. त्याखेरीज जैन आणि बौद्ध संप्रदायांचाही योगावर भर आहे. योगाला दोन्ही संप्रदायांनी अतुलनीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्याखेरीज भगवत् गीता हा एक असा ग्रंथ आहे की जो देशभरात अनेकांच्या नित्यपठणात आहे. गीता हा  माझ्या मते योगशास्त्रावरचा सर्वोत्कृष्ठ ग्रंथ आहे. ७०० श्लोकांच्या गीतेच्या  प्रत्येक अध्यायाच्या शेवटी  दिलेल्या पुष्पिकेत ‘ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे ‘श्रीकृष्णार्जुनसंवादे —-नाम …..अध्यायः’ असा स्पष्ट निर्देश आहे. म्हणूनच कदाचित् निवृत्तीनाथांनी  ज्ञानेश्वरांना गीतेचा भावानुवाद करण्याचा ‘आदेश’ दिला असावा. नाथ संप्रदायात ‘आदेश’ संज्ञेला विशेष अर्थ आहे हे सगळ्यांना माहित आहे. खुद्द निवृत्तीनाथांना ब्रह्मगिरीवर गहिनीनाथांकडून नाथसंप्रदायाची दीक्षा मिळाली होती. ती दीक्षा मघाशी उल्लेख केलेल्या तीन योगमार्गांपैकी दुस-या क्रमांकाचा ‘कृपासिध्द योगमार्ग’ आहे. महाराष्टात योगमार्गाचे स्वरूप पालटून त्याचे भक्तीमार्गात रूपान्तर झाले. किंबहुना योग आणि भक्ती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हेही मराठी माणसांच्या लक्षात आले. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव-तुकारामचे अभंग इत्यादीत योगमार्गच भक्तीमार्गाच्या रूपात प्रकट झाला आहे. ‘योगयाग विधी येणे नोहे सिध्दी। वायाचि उपाधी दंभ’ ह्या हरिपाठाच्या पाचव्या अभंगात ज्ञानेश्वरांनी योगमार्गाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. विशेष म्हणजे योगी ज्ञानेश्वरांनीच हा अंभंग लिहला आहे! त्यांनी योगमार्गाचा परिचय करून देतांना भक्तीमार्गाचा उपहास केला नाही किंवा भक्तीमार्गाचा पुरस्कार करताना योगमार्गाचा उपहास केला नाही. गीतेचा सहावा अध्याय हा थेट योग मार्गावर आहे. ह्या अध्यायाचा अनुवाद करताना  साहजिकच कवि ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला बहर आला आहे.. मूळ गीतेत अर्जुनाने तो शिष्यभावाने योगमार्ग ऐकून घेतला. अर्जुनाच्या मनात आलेल्या शंकांचे निरसनही श्रीकृष्णाने केले. दोघांचे नातेच मुळी  गुरूशिष्याचे होते. सहाव्या अध्यायात चर्चिलेला योग किती सहजसाध्य आहे हे सांगताना ज्ञानेश्वरांनी अनेक अर्थगर्भ ओव्या लिहल्या आहेत. जिथे पक्ष्यांचा किलकिलाट नाही असे एकान्त स्थळ ( एखाददुसरा मोर चालेल! ) निःशब्द परंतु सपाट जमान असलेले स्थळ किंवा गर्दी नसलेले शिवालय चालेल, वा-याची मंद झुळूक असली तरी हरकत नाही, असे सांगून ज्ञानेश्वर लिहतात, ‘मग तेथ आपण। एकाग्र अंतष्करण। करूनि गुरुस्मरण। अनुभविजे।।८६।। थोडक्यात, योग साध्य व्हावा म्हणून गुरूंनी दिलेल्या दीक्षा मंत्रानुसार साधनारंभ करायची शिकवण ज्ञानेश्वर देतात. संपूर्ण सहावा अध्याय योगातील आसनसिद्धी, प्राणायाम, वगैरे सिध्दमार्गांचे विवेचन तर त्यांनी केलेच आहे; शिवाय ‘जे आकाराचा प्रांतु। जे मोक्षाचा एकांतु। जेथ आदि आणि अंतु। विरौनी गेली।।‘  ह्या एकाच ओवीत अत्युच्च समाधीचे वर्णन केले आहे. सिध्दमार्ग कितीही श्रेष्ठ असला तरी गुरूपदिष्ट विद्या चव्हाट्यावर बोंबलून सांगायची नसते, असा दंडक आहे. ज्ञानेश्वरांनी त्याचा उल्लेख अध्यायात  केला आहे. गुरूपदिष्ट विद्येच्या संदर्भात  असलेल्या ह्या बंधनामुळे ह्या मार्गावर भर न देता योग मार्गाच्या नाण्याचीच दुसरी बाजू असलेल्या भक्तीमार्गावर मराठी मनांचा भर आहे. ज्ञानेश्वरांनी तर श्वासालाच बारा अंगुळे चालणा-या वारीची उपमा दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे आधुनिक महाराष्ट्रात सिध्द मार्गाची परंपरा लोप पावली नाही. वारकरी संप्रदायातील अनेक गुरूंनी ती आपल्या परीने सुरू ठेवली. परंतु समाजातल्या भोंदु गुरूंमुळे गुरू संस्था बदनाम झाली.  शिष्याकडून जो सेवा घेत नाही तोच खरा गुरू म्हटला पाहिजे असा संताचा निरोप आहे. पण असे गुरू दुर्मिळच. अलीकडे हटयोगाला पुन्हा चलती आली आहे. २१ जून हा आंतराराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर झाल्याने हटयोगाला उर्जितावस्था आली आहे. २१ जूनला तर सर्वत्र सामूहिक योगसनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ह्यापूर्वीच अनेक शहरात गल्लोगल्ली ‘योगा क्लास’ ( योग नाही बरं का, योगा! ) सुरू झाले! त्यामुळे सर्व योगात ‘राजयोग’ समजला जाणारा म्हणजेच नसता खटाटोप न करता ईश्वरचिंतनाचा योगमार्ग तर विवेकानंदांनी लिहलेली पुस्तके वाचणा-यांनाच फक्त माहित आहे. शहरी सामान्यजनांना तो माहितसुध्दा नाही. सध्या गावोगावी दिसून येणारा योगमार्ग हा प्रामुख्याने हटयोग प्रकारात मोडणारा आहे! तो प्रामुख्याने पतंजलीकृत योगसूत्रावर आधारित आहे. ह्याच योगमार्गाचा देशभर प्रसार झाला आहे. ‘आंतरराष्ट्रीय योगदिना’निमित्त  तर ह्याच मार्गाचा धूमधडाक्याने प्रचार-प्रसार सुरू आहे. विशेषतः आरोग्यासाठी योग आवश्यकच असल्याचा प्रचारकांचा मुद्दा हटकून असतो.  अर्थात योगामुळे उत्तम आरोग्य प्राप्त होते हयात संशय नाही. पण तेवढाचा काही योगाचा उद्देश नाही. पन्नास वर्षांपूर्वी नागपूरमध्य़े जनार्दनस्वामींनी एक पैसाही न घेता हजारो लोकांना योगासने शिकवली.  जनार्दनस्वामी आजच्या अनेक योगशिक्षकांचे परात्पर गुरू आहेत ! सांगण्याचे कारण म्हणजे योग मार्गाचे रूपान्तर भक्तीमार्गात झाले आहे हे लोकांच्या लक्षात आणून देण्याच्या उद्देशाने हा योगविषयक तपशीलवार पूर्वेतिहास दिला आहे. साखरेमहाराज, जोगमहाराज. मामासाहेब दांडेकर इत्यादी वारकरी संप्रदायाच्या धुरिणांनी वारकरी संप्रदाय संघटित केला. वारकरी संप्रदायाचा भक्तीमार्ग योगमार्गाहून वेगळा नाही. पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती ही ‘योगमूर्ती’ आहे असे मूर्तीशास्त्राचे तज्ज्ञ देगलूरकर ह्यांनी सप्रमाण सिध्द केले आहे. विठ्ठल हा विष्णूचा अवतार असला तरी ह्या मूर्तीला दोनच हात असून त्या हातात कमळ आणि शंख आहे. विष्णू मूर्ती बहुधा चतुर्भूज असते. त्याच्या चारपैकी एका हातात शस्त्र असतेच असते. विठ्ठल हा विष्णूचा चोविसावेगळा अवतार आहे. म्हणून साक्षात् विष्णू विठ्ठलाच्या-मनुष्यवेषात- अवतरले आहेत!  म्हणूनच  विठ्ठल मूर्तीस दोनच हात आहेत. योग्याला शस्त्राची गरज नाही असाच जणू मूक संदेश अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला विठ्ठल देत आहे! सहजयोग आणि ज्ञानविज्ञानाची योग्याला गरज आहे.रमेश झवर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!