अमेरिकेतील गौरीस पत्र

By jyubedatamboli on from https://jyubedatamboli.blogspot.com

 अमेरिकेतील गौरीस पत्र✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळीफोटो साभार: अ अमेरिकेचा इन्स्टाग्रामप्रेषक,डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळीजयसिंगपूर, ता. शिरोळ,जि. कोल्हापूर,चि. गौरी, अविनाश व बिल्लूस,अनेक शुभाशिर्वाद ।              मी ६५ वर्षांची मनाने तरुण असलेली प्राथमिक शिक्षिका. ३८ वर्षांच्या सेवेनंतर सात वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहे. शिक्षणशास्त्रात पी. एचडी. झाले असून वाचन लेखनाचा छंद जोपासत आहे. माझी तीन पुस्तके व पाचशेच्या वर लेख प्रकाशित झाले आहेत. चिरंजीव मोहसीन व सूनबाई हिना यांच्या सहकार्याने ब्लॉग लेखन करत आहे.       २/३ वर्षांपूर्वी मोहसीनने स्मार्ट फोन घेऊन दिला. मुलांच्या व नातवंडाच्या मदतीने मोबाईल ऑपरेट करायला शिकले. एके दिवशी यूट्यूबवर तुझा अमेरिकेतील आमचं घर हा व्हिडीओ बघितला आणि अक्षरशः 'अ अमेरिकेचा' या चॅनेलच्या प्रेमात पडले. वेड लावलं मला तुझ्या चॅनेलने. आठ दिवसात भारावलेपणातच व्हिडीओ बघत राहिले. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मला गौरीचं दिसू लागली. आनंदाला, समाधानाला पारावारच राहिला नाही.       आमच्या शिक्षक स्टाफमधील बऱ्याच मित्र मैत्रिणींची मुले अमेरिकेत आहेत. ते ४/६ महिने अमेरिकेत वास्तव्य करून आलेत. ते परत आल्यावर त्यांच्या तोंडून त्यांच्या मुलांच, अमेरिकेचं कौतुक ऐकलं होतं. गौरी, खरं सांगू तुला? तू ना! प्रत्यक्ष अमेरिका पाहण्याचं भाग्य माझ्यासारख्या अमेरिकेत जाऊ न शकणाऱ्या ज्येष्ठांना मिळवून दिलंस. आमची सुप्त इच्छा पूर्ण केलीस, त्याबद्दल तुला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.       अ अमेरिकेमुळे अमेरिकेतील  सगळं सगळं बघता आलं. गौरी अविनाश तुम्ही एवढ्या कमी वयात सातासमुद्रापार गेलात आणि तिथं जाऊन फक्त स्वसुखात मश्गूल न राहता भारतीयांना, मराठी भाषिकांना तुमच्या सुखसागरात मनमुराद विहार करण्याची संधी देत आहात हे पाहून मला खूपच समाधान वाटते. स्वतःचा संसार तर सगळेच सांभाळतात, आम्ही अमेरिकेत राहतो म्हणून वेगळ्याच अभिमानाने फुगून जातात, इतरांना कमी लेखतात पण तुमचं असं नाही. तुमच्या वागण्या बोलण्यात गर्वाचा लवलेशही दिसत नाही. आपल्या घरातील प्रत्येक इव्हेंट मग तो सणवार असो, फेरफटका असो, शाॅपिंग असो तुम्ही कोट्यावधी लोकांशी शेअर करता ही गोष्ट वाटते तितकी सोपी मुळीच नाही. स्वतःची नोकरी, घरकाम, पतीपत्नी धर्म, छोटंसं बाळ सांभाळत सांभाळत व्हिडीओ करणे खरोखरच दिव्य आहे पण ते तुम्ही लीलया पार पाडता, जराही न चिडता, न रागावता व चेहऱ्यावरील हास्य जराही कमी न करता हे सगळं कसं जमतं तुम्हाला? गौरी, तू इतकं छान बोलतेस की ऐकणाऱ्याला वाटतं आपल्या घरातीलच एक व्यक्ती बोलत आहे, ऐकतचं बसावं. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना समजेल उमजेल अशी तुझी कथनशैली मला अगदी मनापासून आवडते. तुझ्या वागण्या बोलण्यातील सहजता सर्वांना खिळवून ठेवते. परदेशात राहून स्वदेशांशी नाळ जोडून ठेवण्याचा तुमचा प्रयत्न खरंच लाजवाब आहे. पिकनिकला तर सगळेच जातात, फोटो सेल्फी कढतात, स्टेटस्ला लावून शायनिंग मारतात पण अशा रम्य ठिकाणी जाऊन स्वतः एन्जॉय करत एवढ्या मोठ्या कुटुंबाला त्यात सामील करून घेण्याची तुमची शैली प्रशंसनीय आहे, कौतुकास्पद आहे. तुम्हा तिघांचा सोन्याचा संसार सद्या अमेरिकेत आहे असं मला वाटत नाही तर तो पृथ्वीवरच्या स्वर्गात स्वच्छंदपणे विहार करत आहे असे वाटते.       यूट्यूब चॅनलवर भल्याबुऱ्या कमेंट्स येतच असतात. एखाद्या वाईट कमेंटने नाउमेद न होता आपलं काम नेटाने कसं करावं याचं आदर्श उदाहरण आहात तुम्ही. तुमचं व्हिडीओचं काम सुरू असताना बिल्लूनं डिस्टर्ब केला तर न चिडचिड, आदळापट न करता समजूतदारपणे, समंजसपणे त्याला हाताळता ही गोष्ट सर्व आईबाबांना अनुकरणीय आहे. खरं सांगा इतका कमालीचा समंजसपणा, कुठून आला तुमच्यात? भारतातून जातांनाच पोती भरून भरून नेलात वाटतं!       तुमच्या अमेरिकेतील घराचा व्हिडीओ तिथल्या राहणीमानाचे दर्शन घडवून गेला. शिकागो ट्रिपच्या व्हिडिओमुळे घरबसल्या शिकागो ट्रिप अनुभवता आली. सफरचंद सुगीचा व्हिडीओ फार आवडला. रसरशीत लालगुलाबी सफरचंद पाहून पोट तृप्त झाले. झीरो बजेट बर्थडे सेलिब्रेशन काटकसरीचा मंत्र सांगून गेले. साचलेला बर्फ काढतानाचा व्हिडीओ श्रमप्रतिष्ठा शिकवून गेला. दिवाळीच्या पार्सल उघडतानाचा गौरीच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद मनात घर करून राहिला. अविनाशच्या जीवन प्रवासाचा व्हिडिओ बालपणातील आमच्या कष्टाची आठवण जागी करणारा ठरला. तुमच्या प्रेमकहाणी चा व्हिडीओ प्रेमात वाहून न जाता संयमी सफल प्रेमाची शिकवण देणारा आहे. 'अ अमेरिकाचा' मुळे सर्वांना तेथील आठवडी बाजार, मच्छी मार्केट, माॅल्स, बगीचे, शेती, तलाव  पाहता आले. थोडक्यात काय तर तुमच्या 'अ अमेरिकेचा' या चॅनलमुळे अमेरिकेतील राहणीमान, जेवणखाण, पिकनीकस्, बर्थडे पार्टीज, वीकेंड सेलिब्रेशन पार्टीज्, फेस्टिव्हलस् या सर्व बाबी प्रत्यक्ष बघता आल्या त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!        आता थोडसं आमच्या कुटूंबाविषयी यात मोठेपणा सांगणे हा उद्देश नाही. फॅमिली मेंबर्सचा परिचय व्हावा हाच उद्देश. मला एक पुत्ररत्न व दोन कन्यारत्ने आहेत. चार नातवंडे व दोन नाती आहेत. गोकुळासारखं गजबजलेलं घर आहे आमचं. 'मज काय कमी या संसारी, सुख आले माझ्या दारी' असे वाटते. माझी कन्या यास्मिन कराडला असते. तुझा परिचय झाल्यापासून वाटते कराडमध्ये माझ्या दोन मुली आहेत दुसरी गौरी बरं का !       अजून खूप लिहावंसं वाटतय पण आवरतं घेते. वेळ काढून पत्राचं उत्तर देशील? आणि भारतात आल्यावर जयसिंगपूरला येशील?तुमची शुभचिंतक,डॉ. सौ. ज्युबेदा तांबोळी.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!