'अनोखे बंधूप्रेम' - आत्मकथन भाग २

By jyubedatamboli on from https://jyubedatamboli.blogspot.com

'अनोखे बंधूप्रेम' - आत्मकथन भाग २ ✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळीफोटोत डावीकडे भैय्या व उजवीकडे मनू         १९७२ च्या दुष्काळाचे पडसाद १९७३ साली सुध्दा दिसत होते. माझा भैय्या 'शौकत' आष्टा येथे डी. एड्. चे शिक्षण घेत होता. कांही दिवस अभ्यासासाठी आष्ट्यातच मित्रांच्या रूमवर राहिला होता. त्याला दररोज माळवाडीहून डबा पाठवला जायचा. आमच्या वेळी परगांवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे डबे पोहचविणारे डबेवाले असत. माळवाडी अगदी छोटेसे खेडेगांव असल्याने एकट्याचा डबा नेण्यासाठी दुधगांवचा डबेवाला माळवाडीस यायला तयार नव्हता व जास्त पैसे देवून इकडे डबा नेण्यासाठी ये असे म्हणण्यासारखी आमची परिस्थिती नव्हती. त्यामुळे माझा छोटा भाऊ मनू सकाळी डबा घेऊन दुधगांवला पायी जायचा व डबेवाल्याकडे भैय्याचा डबा सुपूर्द करायचा, माळवाडी ते दुधगांव हे अंतर सुमारे तीन किलोमीटर आहे. मनू त्यावेळी बारा वर्षांचा होता.       एके दिवशी मनू डबा घेऊन दुधगावला गेला. तर डबेवाला आष्ट्याला निघून गेला होता. मनूने विचार केला,  "आता आपला भैय्या काय खाणार"? माळवाडीला परत जाण्यापेक्षा आष्ट्याला चालत निघाला. दुधगांव ते आष्टा हे अंतर सात कि. मी. आहे. पायात चप्पल नव्हते, डोक्यावर टोपी नव्हती, पाय भाजत होते, उन्हाचा चटका अंगाचे पाणी करत होता. तरी मनू चालत राहिला. मायेने भरलेला डबा भैय्याला पोहचविण्याचा त्याचा निर्धार पक्का होता. त्यामुळेच त्याने उन्हाची  पर्वाच केली नाही. आष्ट्यात पोहोचला. भैय्याची रूम त्याला माहित नव्हती पण एकदा त्याने कॉलेज पाहिले होते. तो कॉलेजच्या गेटजवळ गेला भैय्याची रूम कोठे आहे ते विचारून रूमवर पोहोचला.       तुमचा डबा माळवाडीहून आला नाही असे सांगून डबेवाला निघून गेला होता. सर्व मित्रांचे डबे त्यांच्या गावावरून आले होते. ते जेवायला बसले होते. भैय्याला जेवायला बसण्यासाठी आग्रह करत होते, पण भैय्या टाळाटाळ करत होता. एवढ्यात डब्याची पिशवी घेवून मनू हजर झाला. मनूला पाहून भैय्याला आश्चर्य वाटले. मनू तू कसा आलास रे म्हणत भैय्याने त्याच्या हातातील डबा घेतला. घामाने भिजलेल्या मनूला मिठीच मारली. मनू मित्रादेखत म्हणाला, "मी दुधगांवपासून एस. टी. बसने आलोय". भैय्याने विचार केला, आता यावेळी एस. टी. बसही नाही, तसेच तिकीट काढायला पैसे कुठून आले याच्याजवळ?" भैय्याने माझ्याबरोबर जेव असा खूप आग्रह केला पण मनू जेवायला उठला नाही. त्याने विचार केला, "मी आता याच्याबरोबर जेवलो तर भैय्या संध्याकाळी काय खाणार?" मनू म्हणाला, 'भैय्या मी न्याहरी करूनच निघालोय. न्याहरी करत बसल्यामुळेच मला उशीर झाला व डबेवाला मी येण्यापूर्वी निघून गेला. तू  जेव मी गोष्टींचे पुस्तक वाचतो" असे म्हणून तो वाचनात दंग झाला. जेवण झाल्यावर भैय्या मनूला पोहचविण्यासाठी एस. टी. स्टँडवर आला. त्याच्या खिशात फक्त ६० पैसे होते. एस. टी. चे तिकीट होते पन्नास पैसे. भैय्या मनात म्हणाला छोट्या भावाला खाऊ घेवून देण्याइतकेही पैसे माझ्याजवळ नाहीत. १० पैशाचे फुटाणे घेवून दिले व ५० पैशाचे तिकीट काढून मनूला एस. टी. त बसवून भैय्या रूमकडे गेला. मनू फुटाणे खात खात दुधगावात पोहोचला व तिथून चालत  माळवाडीला आला.       घरात मनू डबा देवून परत का आला नाही म्हणून सर्वजण काळजीत पडले होते. एवढ्या-तेवढ्या कारणासाठी फोन करण्याची सोय त्यावेळी नव्हती. डबा द्यायला हा आष्ट्याला गेला की काय असे आई म्हणत असतानाच मनू परतला, 'एवढा का रे बाळ उशीर', असे आईने विचारताच मनू म्हणाला, "डबेवाला मी जाण्याआधीच निघून गेला होता. माझा भैय्या उपाशी राहणार म्हणून मी चालत चालत आष्ट्याला गेलो व डबा देवून एस. टी. ने परत आलो. भैय्या जेव-जेव म्हणून खूप आग्रह करत होता. पण मी जेवलो नाही, मी जेवलो तर भैय्या संध्याकाळी उपाशी राहणार म्हणून त्याला मी खोटेच सांगितले की मी न्याहरी करून निघालो आहे."       खरं तर त्या दिवशी मनू चहासुध्दा न पिता डबा पोहोचवायला गेला होता. ८-१० दिवसांनी भैय्या घरी आल्यावर त्याला समजले की मनू चहासुध्दा न पिता डबा पोहोचवायला आला होता. एस. टी. ने आलोय असे खोटेच सांगितले होते. मोठ्या भावासाठी उन्हा-तान्हात १३ कि. मी. अंतर पायी प्रवास करणाऱ्या छोट्या भावाचा भैय्याला अभिमान वाटला. मी न्याहरी करून आलोय असे सांगून भैय्यांच्या संध्याकाळच्या जेवणाची काळजी करणारा मनू बंधूप्रेमाचा उत्कृष्ट आदर्शच म्हणावा लागेल. किती दूरदर्शी विचार होते मनूचे एवढ्या लहान वयात !      टीचभर जागेसाठी कोर्टात जाणाऱ्या, प्रसंगी जीवावर उठणाऱ्या भावांची कित्येक उदाहरणे आपण नित्य पाहतो, ऐकतो. या पार्श्वभूमीवर बंधूप्रेमाचा हा प्रसंग अप्रतिम वाटतो.       भैय्या डी. एड. चे शिक्षण घेतल्यानंतर (इंग्लिश विषयासह) रयत शिक्षण संस्थेत नोकरीस लागला. ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्तीचे, सुखासमाधानाचे दिवस जीवन व्यतीत करत आहे. मनू उच्च पदवीधर होऊन कारखान्यात नोकरी करत आहे. दोघांचाही संसार सुखाने चालला आहे. आजही बंधूप्रेम टिकून आहे. एकाला टोचले तर, दुसऱ्याला वेदना होतात. बंधूप्रेमाने चिंब झालेले माझे भाऊ बहिणींच्यावरही प्रेमाचा वर्षाव करतात. आम्ही एकत्र आल्यावर म्हणतो, "गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!"
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!