अनुग्रह

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

 गुरू अडक्याला तीन !...देशात स्वत:ला गुरू म्हणव-यांची संख्या अफाट आहे. त्यांच्यामुळे गुरूसंस्था बदनाम झाली. अजूनही ह्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. विशेष म्हणजे दुस-या गुरूंचा आणि त्यांच्या शिष्यांचा उपहास करणारेच अधिक! माझे सुदैव असे की अशा गुरूंच्या भानगडीत मी पडलो नाही. असे गुरूही माझ्या भानगडीत पडले नाहीत! माझे गुरू गजाननमहाराज अटक हे टेलिफोन खात्यात नोकरीला होते. ऑफिस बॉय म्हणून लागले. हेडक्लार्क म्हणून रिटायर झाले. माझी जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा ते ४२ वर्षांचे होते. मी ३५-३६ वर्षांचा होतो. माझे मित्र हेमंत कारंडे ह्यांनी  नायगाव टेलिफोन कार्यालयात त्यांची भेट घालून दिली. ऑफिस सुटल्यावर आम्ही तिघे चालत दादर स्टेशनला चालत आलो. अटकमहाराजांना कर्जत लोकल पकडायची होती म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही दोघेही मेल एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर गेलो. गाडीत चढण्यापूर्वी मला उद्देशून अटकमहाराज मला म्हणाले, या कर्जतला एकदा. माझ्या मित्रमंडळींची तुम्हाला ओळख करून देतो.  अटकमहाराजांना कर्जत लोकल पकडायची होती म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही दोघेही मेल एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर गेलो. गाडीत चढण्यापूर्वी मला उद्देशून अटकमहाराज मला म्हणाले, या कर्जतला एकदा. माझ्या मित्रमंडळींची तुम्हाला ओळख करून देतो. योगायोगाने लोकसत्तेत कंपनीने टाळेबंदी घोषित केलेली होती. मला बिनपगारी भरपूर सुटी होती. कर्जतला न जाण्याचे कारंडे ह्यांना सांगण्याचे सबळ कारण उरले नाही. नोव्हेबरमध्ये कर्जतला पौर्णिमेच्या रात्री जाण्याचे मी ठरवले. मी आणि कारंडे  'स्लो लोकल' पकडून कर्जतला गेलो. सहा वाजता त्यांच्या घरी पोहोचलो. चहापाणी झाल्यावर मी आणि कारंडे महाराजांसह दहीवलीहून शिरसे येथे चालत जायला निघालो. शिरसे गावात अप्पा कांबळे ह्यांच्या घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा चहापाणी वगैरे नित्याचा कार्यक्रम झाला. अप्पा कांबळेंबरोबर आम्ही तमनाथाच्या दर्शनाला गेलो. तमनाथाचे दर्शन घेऊन झाल्यावर थोडं उल्हास नदीच्या काठी गप्पा मारत बसलो. अंधार पडायला सुरूवात झाली. आम्ही  माघारी फिरलो. हातपाय धवून पुन्हा गप्पांचा फड रंगला. आणखी एकेक जण येत राहिला. १५-२० जण जमल्यावर अप्पा म्हणाले, 'चला, मंडळी पानं लावली आहेत. दोन घास खाऊन घ्या अशी माझी विनंती आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन सारे जण आतल्या खोलीत जेवायला बसलो. पत्रावळीवर भात आणि द्रोणात जहाल तिखट वरण एवढाच काय तो मेनू. माझी जरा पंचाईत झाली. मी खानदेशाचा. नुसता भात हे माझं जेवण कधीच नव्हतं.  अप्पांच्या ते लगेच ध्यानात आले. त्यांनी मुलीला तांदळाच्या भाकरी करायला सांगतले. त्यांची मुलगी मंगला हिने पाच मिनटात तांदळाची भाकरी माझ्या ताटात वाढली. माझा एकूण आहारच कमी होता हे बिचा-यांना काय माहित! जेवल्यानंतर पुन्हा गप्पांचा फड. रात्रीचे बारा वाजायला ५ मिनटं कमी असताना अप्पांनी त्यांच्या पडवीत बारदानाची बिछायत केली. समोर पाटावर दत्ताची तसबीर, तसबिरीसमोर ज्ञानेश्वरीची प्रत बाजूला समई. दानवेमहाराजही आतल्या खोलीतून मुकटा नेसून आले. अटकमहाराजांचे दर्शन घेऊन ते स्थानापन्न झाले. दुस-या बाजूला अटकमहाराज बसले.  ज्ञानेश्वरीच्या पहिल्या दोन ओव्या आणि ‘तुका आला लोटांगणी’ तुकारामाचा एक अभंग अशी प्रार्थना झाली. दानवे महाराजांनी आता तुम्ही बोला’ असं म्हणत प्रत्येकाला बोलायला लावलं. मला म्हणाले, झवरसाहेब, आता तुम्ही बोला! माझ्यापुढे प्रश्न पडला, काय बोलावं ! मी मराठातल्या १-२ आठवणी सांगून वर्तमानपत्र कसं निघतं हे सविस्तर सांगितलं. जाता जाता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कॉलेजमध्ये अभ्यासाला होता हे सांगायला मी विसरलो नाही. 'मी कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही’ असं सांगितलं तेव्हा हंशा पिकला. माझी उत्सुकता ताणली होती, आता पुढे काय? पुन्हा एकदा चहा आला. मात्र, तो कोरा  चहा होता. कसाबसा प्राशन केला. बरोबर चार वाजता दानवेमहाराज म्हणाले, झवरसाहेब पुढे या. माझ्या आयुष्यात हा क्षण  दृष्टीने कसोटीचा होता. मनाशी विचार केला, एवीतेवी कर्जतला येण्यासाठी एवढा वेळ घालवलाच आहे तर आणखी ते काय म्हणू इच्छितात ते ऐकून घ्यायला हरकत नाही. मी पुढे सरकलो. अतिशय हळू आवाजात ते म्हणाले,  मी जो मंत्र म्हणतोय्‌ त्याचा जसाचा तसा उच्चार करा. त्यांनी उच्चारेल्या षडाक्षरी मंत्राचा मी बरोबर उच्चार केला. त्यावेळी प्रसन्नतेने त्यांचा चेहरा उजळून निघाला. आणखी एक गुह्य तुम्हाला मी समजावून सांगतो. ते म्हणजे ‘श’ ला जोडून असलेल्या अर्धा ‘ब’ आणि ‘द’ मिळून जो उच्चार होतो तो करू नका. चुकून झालाच तर आवंढा गिळून मघाशी दिलेल्या मनातल्या मनात मंत्राचा पुनरुच्चार करा. बस्स. तुम्हाला जे दिलंय्‌ ते सांभाळत कामधंदा करा. घरसंसार करा. तुम्ही पत्रकार आहात. तुम्हाला मी अधिक सांगण्याची गरज नाही. नंतर त्यांना नमस्कार करून मी बाजूला होणार तोच त्यांनी मला थांबवले. दर्शन घेण्याची विशिष्ट पध्दत त्यांनी माझे प्रत्यक्ष दर्शन घेऊन दाखवली.  दर्शन घेणा-याला जास्त काळ थांबवायचे नसते. ती त्याची समाधी स्थिती असते. ‘आदेश’ असा उच्चार करून त्याला समाधीतून तत्काळ मोकळे करायचे असते. वस्तुत: दर्शनसुख हीच खरी सुखामय समाधी. दर्शन हीच गुरूला खरी दक्षिणा. पत्नी आणि मुलाबाळांनी घरातल्या कर्त्यांसह सगळ्यांचे रोज दर्शन घ्यायचे असते.  वस्तुतः हात जोडून कर्ता पुरूषही तुमचे दर्शन घेत असतो. दर्शन घेणारा मनातल्या मनात ‘गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू’ हा श्लोक म्हणत असतो. दर्शन घेणाराही मनातल्या मनात मिळालेल्या बीजमंत्राचा उच्चार करत असतो. अशा ह्या दर्शनविधीला नाथ संप्रदायात आत्यंतिक महत्त्व आहे. शंकर, पार्वती, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ आणि नंतर थेट रामकृष्ण परंहस, स्वामी विवेकानंद, जोगमहाराज, मामासाहेब दांडेकर, अटकमहाराज आणि  आम्ही  ( मला काही क्षणांपूर्वी अनुग्रह देणारे दानवेमहाराज ) अशी ही गुरूपरंपरा मला दानवेमहाराजांनी  संक्षेपाने सांगितली. माझ्याकडून वदवूनही घेतली, गजाननमहाराज अटक  ह्यांना मामासाहेब दांडेकरांकडून दीक्षा मिळाली होती. खुद्द मामांना जोगमहाराजांकडून! आधुनिक काळात रामकृष्ण परमहंस, विवेकानंदापर्यंतची पूर्वसूरींची नावे सांगितली जातात. परंतु ऐतिहासिक काळातली ह्याहून अधिक नावे सांगितली जात नाहीत. एखाद्या कुळात बेचाळीस पिढ्यांची नावे कुणालाच माहित नसतात. जास्तीत जास्त आधीच्या सात पिढ्यांपर्यंत नाव सांगितली जातात. गुरूपरंपरपरेचेही असेच आहे. कर्तबगार पुरूषांच्या चरित्रात वा आत्मचरित्रात वंशवेलीचा विस्तार कसा झाला ह्याचा आकृतीबंध देण्याची एके काळी पध्दत होती. तीही आता राहिलेली नाही. मी जरी माझ्या जागेवर येऊन बसलो तरी मी भारावून गेलो होतो. दुस-या क्षणी त्यांनी दिलेले गुह्य वर्मानपत्राच्या नोकरीत काम करताना सांभाळणे अवघड जाईल ह्याची मला लगेच जाणीव झाली. ही स्थिती दानवेमहाराजांना सांगताच ते मला म्हणाले, तुम्हाला ‘हँडब्रेक’ दिला आहे. तो अशा वेळी दाबायचा असतो ! सकाळी साडेपाच-पावणेसहा वाजता कार्यक्रम संपला. प्रार्थना झाली. ह्या प्रार्थनेत ज्ञानेश्वरीतील पसायदानाच्या १० ओव्या आणि नामदेवांच्या अभंगाचा ( ‘कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो माझिया विष्णूदासा भाविकांसी ) समावेश होता. लहानथोर वगैरे भेद बाजूला सारून प्रत्येक जणाने एकमेकांचे दर्शन घेतले. मीही बाकींच्या अनुकरण केले. परंतु ते फार यांत्रिक होते असे मला आठवते. परंतु हळुहळू ते वळण पडले ! ज्ञानेश्वरांना त्यांचे बंधू निवृत्तानाथ. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनाकडून अशी ही गुरूंची पूर्वपरंपरा थेट आदिनाथापर्यंत जाऊन भिडते. हीच नाथपरंपरा आहे. आधुनिक काळात संसारी जनांना दीक्षा देण्याच्या पध्दतीत बदल होत गेला. तरी मूळ मंत्र आणि गुह्य ह्यात अजिबात बदल झाला नाही. प्रत्येक गुरू परंपरेचे म्हणून स्वत:चे असे काही वैशिष्ट्य असते. मला ज्या पध्दतीने अनुग्रह मिळाला असेल त्याच पध्दतीने तो इतरांना मिळाला असेल असे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. इत्यलम्‌!रमेश झवर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!